'या' राज्यांमध्ये भरपूर प्रमाणात सोनं मिळतं! जाणून घ्या कोण आहे नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:04 PM2023-09-07T19:04:19+5:302023-09-07T19:09:06+5:30

भारत हा जगातील सर्वात जास्त सोने वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे.

भारत हा जगातील सर्वात जास्त सोने वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. सोने खरेदी करणे हा भारतातील परंपरेचा भाग आहे आणि विशिष्ट प्रसंगी ते खरेदी करणे शुभ मानले जाते. भारत जगातील इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात करतो. मात्र, भारतातही सोन्याच्या खाणी आहेत.

कर्नाटकात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन होते. गेल्या वर्षी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) ने सोन्याच्या खाणीबाबत सर्वेक्षण केले होते. बिहारमध्येही सोन्याचा मोठा साठा असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आपल्या देशातील कोणती राज्ये आहेत, तिथे सर्वाधिक सोन्याचे उत्पादन होते ते जाणून घेऊया.

कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठे सोने उत्पादक राज्य आहे. देशातील ८० टक्क्यांहून अधिक सोने कर्नाटकातील खाणीतून येते. कर्नाटकातील कोलार गोल्ड फील्ड ही देशातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे आणि ती कोलारमध्ये आहे.

याशिवाय धारवाड, हसन आणि रायचूर जिल्ह्यातूनही सोने काढले जाते. कर्नाटकात १७ लाख टन सोन्याच्या धातूचा साठा असल्याचे मानले जाते.

आंध्र प्रदेश हे देशातील दुसरे राज्य आहे, तिथे सर्वाधिक सोन्याचे उत्पादन होते. राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील रामगिरी येथे सोन्याच्या खाणी आहेत. याशिवाय चित्तूर आणि पलाचूर येथेही सोन्याचे साठे उपलब्ध आहेत.

झारखंडमध्ये दरवर्षी सुमारे ३४४ किलो सोन्याचे उत्पादन होते. राज्यातील सर्वाधिक सोने सुवर्ण रेखा नावाच्या नदीत सापडते. नदीच्या वाळूमध्ये गाळाच्या स्वरूपात सोने आढळते. झारखंडमधील सिंहभूमी आणि सोनपत खोऱ्यात सोने प्रामुख्याने आढळते.

सध्या केरळमध्येही सोन्याचे उत्पादन होते. राज्यातील पुन्ना पुझा आणि छबियार पुझा नद्यांच्या जवळ काही भागात सोने सापडते. भारतातील सोन्याच्या खाणीला मोठा इतिहास आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, जगात सोन्याच्या खाणकामाला सुरुवात झाली, तेव्हापासून आतापर्यंत २ लाख टनांहून अधिक सोने काढण्यात आले आहे.

जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, देशातील एकूण सोन्यापैकी ४४ टक्के सोने बिहारमध्ये आहे. सर्वेक्षणानुसार, सोन्याचे प्रमाण सुमारे २२३० लाख टन असू शकते. बिहारमधील जमुई जिल्ह्यात सोन्याचा सर्वाधिक साठा आहे. येथे सुमारे २७.६ टन सोन्याचा साठा आहे.

जमुईच्या करमाटिया, झाझा आणि सोनो भागात सोन्याचा साठा आहे. सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर सोने काढण्याची तयारी सुरू झाली. गेल्या काही वर्षांत देशातील अनेक भागात सोन्याच्या खाणींचा शोध लागला आहे.