Adani Enterprises : स्वतंत्र ऑडिटर हायर करणार का? अदानी समूहानं म्हटलं, “ती तर अफवा…”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:21 PM2023-02-16T16:21:18+5:302023-02-16T16:32:04+5:30

अदानी समूह ग्रँड थॉर्नटनची नियुक्ती करणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं होतं.

अदानी समूहाने न्यूयॉर्क स्थित अकाउंटन्सी फर्म ग्रँट थॉर्नटनला त्यांच्या काही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्यासाठी नियुक्त केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. मात्र, आता अदानी समूहाने पुढे येऊन या सर्व अफवा असल्याचं म्हटलं.

अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी, 16 फेब्रुवारी रोजी स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या निवेदनात ही बातमी 'बाजारातील अफवा' असल्याचं म्हटलं आहे. कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हे वृत्त बाजारातील अफवा आहे आणि त्यामुळे त्यावर भाष्य करणं आमच्यासाठी अयोग्य आहे."

वृत्तसंस्था रॉयटर्सने १४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अदानी समूहाने अमेरिकन शॉर्ट-सेलर फर्म हिंडेनबर्गच्या दाव्यांचे खंडन करण्यासाठी त्यांच्या काही कंपन्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी अकाउंटन्सी फर्म ग्रँट थॉर्नटनची नियुक्ती केली आहे. हिंडेनबर्गच्या आरोपांमुळे गेल्या काही आठवड्यांत अदानी समूहाचे शेअर्स आणि बाँड्सचे मोठे नुकसान झाले आहे.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की हिंडेनबर्ग अहवालानंतर, अदानी समूह कायद्यांच पालन, संबंधित पक्ष व्यवहार आणि अंतर्गत नियंत्रणे यांच्याशी संबंधित मुद्द्यांचं स्वतंत्र मूल्यांकन करण्याचा विचार करत आहे.

रॉयटर्सने एका सूत्राचा हवाला देऊन सांगितलं की, ग्रँट थॉर्नटन हे अदानी समूहात झालेले संबंधित पक्षाचे व्यवहार कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या नियमांनुसार आहेत की नाही हे देखील पाहतील.

याच्या एक दिवस आधी, १३ फेब्रुवारी रोजी, अदानी समूहाने एका निवेदनात म्हटलं होते की त्यांच्या सर्व समूह कंपन्यांकडे अत्यंत मजबूत बॅलन्स शीट आणि मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फ्रेमवर्क आहे.

दरम्यान, शेअर बाजार नियामक सेबीनं (SEBI) हिंडनबर्गच्या अहवालात करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करत असल्याची पुष्टी केली. यासोबतच अहवाल येण्यापूर्वी आणि नंतर लगेचच बाजारात घडलेल्या घडामोडींवरही त्यांची नजर असल्याचंही म्हटलंय.