Adani Files: आधीच अंदाज आलेला? नॉर्वेच्या वेल्थ फंडाने अदानीतील करोडोंचे शेअर्स डिसेंबरमध्येच विकले; म्हणाले आमचेही लक्ष होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 08:58 PM2023-02-09T20:58:16+5:302023-02-09T21:02:42+5:30

नॉर्वेच्या १.३५ लाख कोटी डॉलरच्या वेल्थ फंडाने सांगितले की, काही आठवड्यांपूर्वीच आम्ही अदानींच्या कंपन्यांतील हिस्सा विकून मोकळे झालो होतो.

हिंडनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपमध्ये गैरव्यवहार झाल्याचे जगासमोर आले आणि जगातील दोन नंबरचे श्रीमंत बनलेल्या अदानी पार गडगडले. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एवढी मोठी घसरण झाली की थेट कंपन्यांचे भांडवल निम्म्यावर आले. अशातच एका परदेशी वेल्थ फंडाने डिसेंबरमध्येच अदानींच्या कंपन्यांतून आपला सारा पैसा काढून घेतल्याचे समोर आले आहे.

नॉर्वेच्या १.३५ लाख कोटी डॉलरच्या वेल्थ फंडाने सांगितले की, काही आठवड्यांपूर्वीच आम्ही अदानींच्या कंपन्यांतील हिस्सा विकून मोकळे झालो होतो.

फंडातील ईएसजी रिस्क मॉनिटरिंगचे प्रमुख क्रिस्टोफर राइट म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून ईएसजीच्या मुद्द्यांवर अदानीचे निरीक्षण केले आहे. फंडाने 2014 पासून आणि 2022 च्या अखेरीस 5 अदानी कंपन्यांचे शेअर्स विकले आहेत. फंडाची अदानी पोर्ट्ससह तीन समूह कंपन्यांमध्ये गुंतवणूक होती.

वर्षाच्या अखेरीपासून आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील हिस्सा कमी करण्यास सुरुवात केली होती. आता आमच्याकडे अदानींच्या कंपन्यांपैकी एकही शेअर नाहीय, असे ते म्हणाले.

या फंडाकडे अदानी ग्रीन एनर्जीमध्ये $ 52.7 दशलक्ष किमतीचे शेअर्स होते. अदानी टोटल गॅसचे 83.6 दशलक्ष डॉलर्सचे शेअर्स होते. अदानी पोर्टचे $63.4 दशलक्ष किमतीचे स्टेक होते. हे सर्व या फंडाने आधीच विकून टाकले आहेत.

अदानी समूहाला सातत्याने धक्के बसत आहेत. बुधवारी, अदानी समूहाची सर्वात मोठी विदेशी गुंतवणूकदार टोटल एनर्जीने अब्जावधी डॉलर्सचा हायड्रोजन प्रकल्प थांबविला आहे. हिंडेनबर्गच्या आरोपांबाबत स्पष्टतेची वाट पाहत असल्याचे त्यात म्हटले आहे.

दुसरीकडे MSCI ने सार्वजनिक बाजारात व्यवहारासाठी सहज उपलब्ध असलेल्या अदानी समूहाच्या समभागांच्या संख्येचा आढावा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गुरुवारी अदानीच्या अनेक कंपन्यांचे समभाग घसरले.

गुरुवारी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 10.72 टक्क्यांनी घसरून बंद झाले. अदानी पोर्टचा शेअर 2.90 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटलचे समभाग आज लोअर सर्किटला आले. अदानी ग्रीनचा शेअर 4.96 टक्क्यांनी घसरून बंद झाला. मात्र, अदानी विल्मरच्या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे.