Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:20 AM 2021-09-22T11:20:08+5:30 2021-09-22T11:36:35+5:30
गुजरातच्या कच्छमध्ये असणारे मुंद्रा बंदर Adani ग्रुपच्या ताब्यात असून, ड्रग्ज जप्तीनंतर सोशल मीडियावरील अनेक उलट-सुलट चर्चांनंतर कंपनीकडून यावर खुलासा करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) ड्रग्सविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली असून, गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा बंदरातून सुमारे १२ ते १५ हजार कोटी रुपयांचे ३ हजार किलो हेरॉईन ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मात्र, यातच आता गुजरातच्या कच्छमध्ये असणारे मुंद्रा बंदर Adani ग्रुपच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर अनेक उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर अदानी ग्रुपकडून यावर खुलासा करण्यात आला असून, स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
या तस्करीशी कोणताही संबंध नाही, सोशल मीडियावर नाहक बदनामी केली जात आहे, असे स्पष्टीकरण अदानी ग्रुपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून परिपत्रक जारी करत देण्यात आले आहे. अवैध अंमली पदार्थांचा साठा आणि आरोपींची धरपकड केल्याप्रकरणी आम्ही डीआरआयचे अभिनंदन करतो.
डीआरआय आणि कस्टम्स विभागाने अफगाणिस्तानातून आलेल्या दोन कंटेनरमधून मुंद्रा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलवर (एमआयसीटी) मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला. डीआरआय आणि कस्टम्स विभागाला सरकारने बेकायदेशीर कार्गो उघडून तपासणी करण्याचे अधिकारी दिले आहेत.
मात्र देशभरातील कुठलाही पोर्ट ऑपरेटर कंटेनरची तपासणी करु शकत नाही, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी ग्रुपविरोधातील सोशल मीडियावर सुरु असलेल्या खोट्या आणि बदनामीकारक चर्चांना पूर्णविराम मिळेल, अशी आशा आम्ही व्यक्त करतो.
आमच्या कुठल्याही पोर्टवर उतरणाऱ्या कार्गोची तपासणी करण्याचे आमचे धोरण नाही, असेही Adani ग्रुपने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात आशी ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीने अफगाणिस्तानमधून काही बाबी इम्पोर्ट केल्याची टिप डीआरआयला लागली. त्यातही यात ड्रग्ज असल्याचे टिप देणाऱ्याने सांगितले होते.
ड्रग्जची ही खेप अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात आणली आहे. चार दिवस चाललेल्या डीआरआयच्या मोठ्या ऑपरेशननंतर हा माल जप्त करण्यात आला असून आहे. या कारवाईनंतर डीआरआयकडून अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
अनेक ठिकाणी छापेमारी- विशेष म्हणजे सुरुवातीच्या तपासात ९ हजार कोटी रुपयांची ३ हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. पण, हळूहळू हा आकडा वाढत १२ ते १५ हजार कोटींच्या घरात गेला असून, आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
डीआरआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरोइन घेऊन जाणारे कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका फर्मने आयात केले होते. या फर्मने कंटेनरमध्ये 'टॅल्कम पावडर' असल्याचा बनाव केला होता.
अफगाणिस्तानच्या कंधार येथील हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने हे कंटेनर पाठवले आहे. डीआरआयने या कंटेनरची तपासणी केल्यानंतर हा एवढा मोठा ड्रग्सचा साठा दिसून आला. अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठा हेरॉईन उत्पादक देश आहे.
अफगाणिस्तानात जागतिक उत्पादनाच्या ८० ते ९० टक्के हेरॉईनचे उत्पादन होते. गेल्या काही वर्षात अफगाणिस्तानमध्ये हेरॉईनचे उत्पादन झपाट्याने वाढले आहे. हेरॉईन उत्पादन तालिबानचे प्रमुख आर्थिक स्त्रोत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तालिबान आणि आयएसआयशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.