अदानी ग्रुपमधील गुंतवणूकीने LIC ला जबर धक्का, 50 दिवसांत 50,000 कोटी बुडाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:43 PM2023-02-24T15:43:15+5:302023-02-24T15:49:42+5:30

LIC notional loss: हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला मोठा तोटा झाला आणि त्यामुळे LIC चेही मोठे नुकसान झाले आहे.

LIC investment: हिंडेनबर्गच्या (Hindenburg) भोवऱ्यात अडकलेल्या गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील Adani Groupला आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा सहन करावा लागला आहे, तर अदानींच्या कंपन्यांमधील गुंतवणूक LIC खूप महागात पडली आहे. अदानीच्या शेअर्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीला अवघ्या 50 दिवसांत 50,000 कोटी रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे.

50 दिवसांपूर्वी LIC ची गुंतवणूक किती होती?-बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, एलआयसीने गौतम अदानी यांच्या कंपन्यांमध्ये (LIC Investment In Adani Shares) मोठी गुंतवणूक केली आहे.

31 डिसेंबर 2022 रोजी विमा कंपनीचे गुंतवणूक मूल्य 82,970 कोटी रुपये होते, जे 23 फेब्रुवारी 2023 रोजी 33,242 कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यानुसार या 50 दिवसांत एलआयसीला 49,728 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या एका महिन्यात हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून नुकसान झपाट्याने वाढले आहे.

एलआयसीचे शेअर्सही पडले- एलआयसीने अदानी समूहाच्या जवळपास सर्वच सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अंबुजा सिमेंट्स आणि एसीसी यांचा समावेश आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, वित्त मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत एक्स्चेंजला अधिकृत माहिती दाखल करेपर्यंत आम्ही कोणतीही टिप्पणी करू शकत नाही. बाजारातील गुंतवणुकीचे मूल्य सतत बदलत असते. एलआयसीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी बातमी लिहिपर्यंत ते घसरणीसह 585.70 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

समूहाचा MCap $100 अब्ज पेक्षा कमी- 24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहावरील संशोधन अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये शेअर्स आणि कर्जाच्या फेरफारबाबत मोठे दावे करण्यात आले होते.

हा अहवाल आल्यानंतर अदानीच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अदानी समूहाचे बाजार भांडवल 12 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आणि ते $100 अब्जच्या खाली पोहोचले. 25 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झालेल्या LIC मध्ये गुंतवलेल्या सर्व स्टॉक्समधील घसरण अजूनही सुरूच आहे.

अदानींच्या शेअर्समधील घसरणीवर नजर टाकल्यास, एका महिन्यात अदानी टोटल गॅसची किंमत 80.68% कमी झाली आहे, तर अदानी ट्रान्समिशन 74.21%, अदानी ग्रीन एनर्जी 73.50% आणि अदानी एंटरप्रायझेस 64.10% कमी झाले आहेत. याशिवाय अदानी पॉवर 48.40%, NDTV 41.80% पर्यंत घसरले आहे. अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट्स, अदानी पोर्ट्स आणि एसीसीच्या शेअर्समध्येही 28% ते 40% पर्यंत घट झाली आहे.

श्रीमंतांच्या यादीत अदानी कुठे पोहोचले? समुहाचे शेअर्स कोसळल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीतही दिवसेंदिवस घट होत गेली आणि अदानी अब्जाधीशांच्या यादीत टॉप-4 वरून 29 व्या स्थानावर घसरले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती $41.7 बिलियनवर आली आहे.