अदानींचा बंदर उद्योग तेजीत; तीन महिन्यांत १६ टक्क्यांच्या वाढीसह तब्बल १५७३ कोटींचा नफा By देवेश फडके | Published: February 10, 2021 12:59 PM 2021-02-10T12:59:53+5:30 2021-02-10T13:04:33+5:30
विविध विमानतळे, रेल्वे स्थानकांची कमान हाती घेत असलेल्या अदानी ग्रुपचा बंदर उद्योगही अत्यंत तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला एकूण १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. मुंबई : मंगळुरू, लखनौ आणि अहमदाबादनंतर आता मुंबई विमानतळची धुरा उद्योजक गौतम अदानी यांच्याकडे गेली आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) मधील २३.५ टक्के हिस्सा अदानींनी खरेदी केला आहे. विविध विमानतळे, रेल्वे स्थानकांची कमान हाती घेत असलेल्या अदानी ग्रुपचा बंदर उद्योगही अत्यंत तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अदानी पोर्ट्स अॅंड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (APSEZ) आपल्या नफ्यामध्ये १६.२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला एकूण १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. गतवर्षी याच कालावधीमध्ये कंपनीला एक हजार ३५६ कोटी ४३ लाख रुपये इतका नफा झाला होता.
अदानी ग्रुपच्या पोर्ट्स अॅंड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडकडून मुंबई शेअर बाजाराला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कंपनीची एकूण कमाई ही तिसऱ्या तिमाहीमध्ये ४ हजार २७४ कोटी ७९ लाख रुपये इतकी झाली.
गेल्या काही कालावधीत आमच्या कामगिरीमुळे APSEZ ला आपला व्यापार रुळावर आणता आला आहे. उद्योग चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे हे संकेत असून, कंपनीच्या मालकीची संपत्ती, भारतीय बाजारपेठेमध्ये वाढणारा वाटा, आमची यंत्रणा आणि आताचे नेतृत्व हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष करन अदानी यांनी सांगितले.
गतवर्षीच्या याच तिसऱ्या तिमाहीत कंपनीची एकूण कमाई ३ हजार ८३० कोटी ४३ लाख इतका झाली. याच कालावधीत यावर्षी कंपनीने दोन हजार २५८ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले. हाच आकडा गेल्या वर्षीच्या तिमाहीत २ हजार ९१ कोटी ४० लाख रुपये होता, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
देशातील १२ महत्त्वाच्या ठिकाणी APSEZ ची केंद्र आहेत. यामध्ये मुंद्रा, दाहीज, कांडला, हजीरा या गुजरातमधील चार, ओदिशामधील धामरा, गोव्यातील मार्मागोवा, आंध्रमधील विशाखापट्टणम आणि कृष्णापट्टणम तसेच चेन्नईमधील कत्तुपाली, एन्नोरे येथून APSEZ चा बिझनेस चालतो.
भारतातील बंदरांमधून होणाऱ्या एकूण व्यापारापैकी २४ टक्के क्षमता ही APSEZ ची आहे. आताच्या घडीला कंपनी केरळमधील तसेच म्यानमारमध्ये कंटेनर टर्मिनल उभारण्याचे काम करत आहे. अदानी उद्योग समुहातील बंदरे आणि त्यासंदर्भातील व्यापाराचे काम करणारी APSEZ ही देशातील सर्वांत मोठी कंपनी आहे.
APSEZ ची लॉजिस्टिक आणि गोदामाच्या उद्योगांमधील गुंतवणूक वाढत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करत उद्योगचा विस्तार करण्याला आमचे प्राधान्य आहे. २०२५ पर्यंत कार्बन न्यूटल पद्धतीने उद्योग करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे, असेही करन अदानी यांनी सांगितले.