Adani Shares Stock Market : अदानी समूहाच्या शेअर्सची दयनीय स्थिती, ४ दिवसांत १.७० लाख कोटी स्वाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 09:01 AM2022-12-26T09:01:54+5:302022-12-26T09:08:58+5:30

गेल्या आठवड्यात शेअर बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली. दरम्यान, चार दिवसांमध्ये तब्बल 1.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये (Mcap) 1.70 लाख कोटी रुपयांचा एकत्रित तोटा झाला आहे. अदानी विल्मर, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

शुक्रवारी अदानी विल्मरचा शेअर सात टक्क्यांनी घसरून 512.65 रुपयांवर आला. चार दिवसांत कंपनीचे शेअर्स 18.53 रुपयांनी घसरले. दरम्यान, चार दिवसांच्या घसरणीदरम्यान बीएसई सेन्सेक्समध्ये 1,630 अंकांची किंवा 2.65 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली.

शुक्रवारी अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागलं. अदानी पॉवरचा शेअर पाच टक्क्यांनी घसरून 262.20 रुपयांवर बंद झाला. हा स्टॉक 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान तब्बल 14.23 टक्क्यांनी घसरला आहे.

अदानी ट्रान्समिशनचा शेअर बीएसईवर 9.29 टक्क्यांनी घसरून 2,284 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारपर्यंतच्या चार सत्रांमध्ये या शेअरमध्ये 13 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये 5.65 टक्क्यांनी घसरण होऊन तो 3,650 रुपयांवर बंद झाला. गेल्या चार सत्रांमध्ये शेअर 8.51 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या चार सत्रांमध्ये अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सुमारे 8-9 टक्क्यांनी घट झाली आहे. अदानी टोटल गॅसचे शेअर्सही गेल्या चार सत्रांमध्ये 8 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

अदानी समूहाच्या सात कंपन्यांच्या शेअर्सचे एकत्रित एम-कॅप 17.04 लाख कोटी रुपये होते, जे 19 डिसेंबरच्या 18.81 लाख कोटी रुपयांवरून 9.41 टक्क्यांनी कमी होते. यापैकी अदानी एंटरप्रायझेसचे एम-कॅपमध्ये सुमारे 40,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यानंतर अदानी ट्रान्समिशन (एम-कॅप लॉस 36,521.23 कोटी रुपये), अदानी टोटल गॅस (27,533.75 कोटी रुपये) आणि अदानी ग्रीन एनर्जी (24,528.75 कोटी रुपये) घसरले.

तथापि, या घसरणीनंतरही, अदानी एंटरप्रायझेसचे शेअर वर्षाची अखेर 115 टक्क्यांच्या वाढीसह (2022 मध्ये आतापर्यंत) करत आहेत. अदानी विल्मर (92 टक्क्यांनी वाढ), अदानी टोटल गॅस (90 टक्क्यांनी), अदानी ग्रीन (39 टक्क्यांनी), अदानी ट्रान्समिशन (36 टक्क्यांनी वाढ) आणि अदानी पोर्ट्स (9 टक्क्यांनी) वाढ दिसून आली.