शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 09:16 AM2024-10-08T09:16:52+5:302024-10-08T09:23:27+5:30

यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये नोकऱ्या जाऊ शकतात. २००१ मध्ये चीन डब्ल्यूटीओमध्ये सामील झाल्यानंतर पहिला 'चायना शॉक' बसला.

China Shock 2.0 : अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या क्लिन एनर्जी आणि हायटेक उत्पादनांवर भरमसाठ शुल्क लादलं आहे. या क्षेत्रातील चिनी उत्पादनांच्या मोठ्या लाटेला आळा घालणं हा त्याचा उद्देश आहे. चीनला आपल्या उत्पादनांनी जगात आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे.

तज्ज्ञांनी याला 'चायना शॉक २.०' असं नाव दिलं आहे. यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये नोकऱ्या जाऊ शकतात. २००१ मध्ये चीन डब्ल्यूटीओमध्ये सामील झाल्यानंतर पहिला 'चायना शॉक' बसला. मग स्वस्त चिनी उत्पादनांनी जगभरातील बाजारपेठांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. यामुळे जगभरातील लोकांच्या नोकऱ्या गेल्या.

भारत आणि पाश्चिमात्य देशांमध्ये चिनी आयातीचा वाढता ओघ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या २५ वर्षांतील जागतिकीकरणाचा एक परिणाम म्हणजे अनेक नोकऱ्या जाणं आणि राहणीमानाविषयी असंतोष आहे, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी म्हटले होते. व्यापाराचं केवळ जागतिकीकरण झालेलं नाही. अर्थात त्याला हत्यार बनवण्यात आलंय, असंही ते म्हणाले.

क्लिन एनर्जी आणि हायटेक क्षेत्रात चीनकडून उत्पादनांच्या नव्या लाटेमुळे भारतासह अनेक क्षेत्रांतील नोकऱ्या जाण्याची शक्यता असताना जयशंकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. याला 'चायना शॉक २.०' असे नाव देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चीनवर भरमसाठ शुल्क लादलं आहे.

२००१ मध्ये चीन जागतिक व्यापार संघटनेत (WTO) सामील झाल्यानंतर स्वस्त चिनी वस्तूंनी जागतिक बाजारपेठेत धुमाकूळ घातला तेव्हा पहिला धक्का बसला. यामुळे जगभरातील नोकऱ्या गेल्या. भारतानंही चिनी उत्पादनांवरील सबसिडीविरोधी उपाययोजना वाढवल्या आहेत. एकट्या २०२४ मध्ये भारतानं चीनविरोधात ३० हून अधिक अँटी डम्पिंग उपाययोजना राबविल्या. या कोणत्याही देशासाठी सर्वाधिक आहेत.

उत्पादनांमध्ये प्लास्टिक प्रोसेसिंग मशीन, व्हॅक्यूम-इन्सुलेटेड फ्लास्क, वेल्डेड स्टेनलेस स्टील पाईप आणि ट्यूब, सॉफ्ट फेराइट कोर आणि औद्योगिक लेसर मशीन सारख्या औद्योगिक वस्तूंचा समावेश आहे. अँटी डम्पिंग ड्युटीची मागणी करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांचं म्हणणं आहे की, चीन ही बाजार अर्थव्यवस्था नाही. स्पर्धा संपविण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने भारतीय उद्योगांना नुकसान पोहोचवण्याचं काम करतं असं त्यांचं म्हणणं आहे.