विक्रम किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर मानसी सांभाळणार 500 कोटींचा व्यवसाय; जाणून घ्या कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 03:36 PM2022-12-03T15:36:25+5:302022-12-03T20:30:09+5:30

Kirloskar Group : मानसी या फक्त 32 वर्षांच्या आहेत आणि त्या आधीच आपल्या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत.

विक्रम किर्लोस्कर (Vikram Kirloskar) यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीवर मोठी जबाबदारी आली आहे. मानसी या विक्रम यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. त्यामुळे मानसी या किर्लोस्कर कुटुंबाच्या वारसदाराची भूमिका निभावणार असल्याचे म्हटले जात आहे. मानसी या फक्त 32 वर्षांच्या आहेत आणि त्या आधीच आपल्या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत.

मानसी या बराच काळ व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. मानसी आपल्या वडिलांच्या कंपनीची कार्यकारी संचालक आणि सीईओ आहेत. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून त्या आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करत आहे. मानसी यांचे 2019 मध्ये लग्न झाले होते. मानसी यांचे लग्न रतन टाटा यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा मुलगा नेविल यांच्याशी झाले आहे.

मानसी या किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडला (Kirloskar Systems Ltd) व्यवसायात पुढे नेण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आपल्याला सर्व काही रेडीमेड मिळाले आहे, परंतु जर त्याकडे लक्ष दिले नाही तर ते एका रात्रीत गमावू शकते. दरम्यान, मानसी यांना स्वत:च्या बळावर कंपनीला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे.

मानसी यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच नवीन उंची गाठली आहे. यासोबतच मानसी यांची 2019 मध्ये उदयोन्मुख बिझनेस लीडर म्हणून निवड झाली होती. मानसी यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाईनमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी टोयोटा किर्लोस्कर मोटारमध्ये 3 वर्षे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी व्यवसायात मॅनेजमेंट लेव्हलचा नवीन प्रकार सामील केला.

3 वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसी यांनी वडिलांसोबत आपला व्यवसाय पुढे नेण्यास सुरुवात केली. यानंतर, त्यांनी एकत्रितपणे टोयोटा मटेरियल हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड लाँच केले आणि विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले.

मानसी यांना पेंटिंगचीही खूप आवड आहे. वयाच्या 13 व्या वर्षापासून त्या पेंटिंग करत आहेत आणि त्यांनी अनेक प्रदर्शनेही भरवली आहेत. 13 वर्षांच्या असताना त्यांचे पहिले प्रदर्शन होते. याशिवाय त्यांना पोहण्याचीही खूप आवड आहे.

किर्लोस्कर ग्रुपबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याजवळ अनेक कंपन्या आहेत. यापैकी अनेक कंपन्यांचे शेअर्सही बाजारात लिस्ट आहेत. किर्लोस्कर ब्रदर्स (KBL), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (KIL), किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड (KFIL), किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOIL), किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड (KPCL), किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड (KECL), एनवायर इलेक्ट्रोडाइन लिमिटेड आणि जीजी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेड अशा कंपन्या आहेत.