अनेक वर्षांच्या वादानंतर पती-पत्नीमध्ये समेट; गौतम सिंघानिया, नवाज मोदी जेके हाऊसमध्ये राहणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 09:10 IST2025-04-08T08:57:44+5:302025-04-08T09:10:16+5:30

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात समझोता झाला आहे. आता हे दोघे जेके हाऊसमध्ये एकत्र राहणार असल्याची माहिती समोर आलीये.

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात समझोता झाला आहे. आता हे दोघे जेके हाऊसमध्ये एकत्र राहणार आहेत. मुंबईतील मोठमोठ्या कुटुंबांमध्ये वाद, तडजोडी होत असतात. पण, सिंघानिया कुटुंबाची कहाणी वेगळी आहे.

गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यात मतभेद होते. पण, आता दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. जेके हाऊसमध्ये ते नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहेत. फॉर्च्युननं कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम सिंघानिया आणि नवाज यांच्यात एक समझोता झाला आहे. महिनाभरापूर्वी या दोघांची त्यांच्या दोन मुलींशी पुन्हा भेट झाली. मालमत्तेच्या विभागणीबाबतही त्यांनी भाष्य केलेय. सिंघानिया कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

गौतम सिंघानिया हे रेमंड लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याने पत्नी नवाज यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली. त्यांचं नातं ३२ वर्षे टिकलं. त्यांना दोन मुली आहेत. १९ वर्षीय निहारिका आणि ११ वर्षीय निशा. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नवाज यांना रेमंड समूहाच्या तीन खासगी कंपन्यांच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आलं होतं. मात्र, त्या रेमंड लिमिटेडच्या संचालक होत्या. परंतु, जेके हाऊसमध्ये परतल्यानंतर त्यांनी काही आठवड्यांपूर्वी या पदाचा राजीनामा दिला.

यापूर्वी नवाज यांना समूहातील कंपन्यांच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आलं होतं, तेव्हा त्यांनी सिंघानिया यांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यामुळे आपल्याला वाईट वागणूक देण्यात आल्याचं म्हटलं होतं. गौतम सिंघानिया यांच्या मालमत्तेत त्यांनी ७५ टक्के वाटा मागितला. यातील २५ टक्के रक्कम त्यांच्या मुलींसाठी होती.

रेमंड लिमिटेडला पाठवलेल्या राजीनाम्यात नवाझ मोदी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. संचालक मंडळानं मला त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात दिलेल्या संस्मरणीय पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असं त्या म्हणाल्या होत्या. गौतम सिंघानिया यांचा वडील विजयपत सिंघानिया यांच्याशीही मालमत्तेबाबत वाद होता. २०१७ मध्ये हा वाद वाढला. विजयपत सिंघानिया यांनी आरोप केला की, रेमंड लिमिटेडनं त्यांना दक्षिण मुंबईतील जेके हाऊसमधील डुप्लेक्स देण्यास नकार दिला होता.

रेमंड ग्रुप आता आपल्या कोअर बिझनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. यामध्ये लाइफस्टाइल, रिअल इस्टेट आणि इंजिनीअरिंगचा समावेश आहे. टेक्स्टाईल आणि अपेरल, कन्झ्युमर केअर, रिअल इस्टेट आणि इंजिनीअरिंग क्षेत्रात कंपनीची स्थिती मजबूत आहे. २०२३ मध्ये कंपनीने आपला एफएमसीजी व्यवसाय गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सला २,८२५ कोटी रुपयांना विकला. या व्यवसायात डिओड्रेंट उत्पादनांचा समावेश होता.

टॅग्स :रेमंडRaymond