येस बँकेपाठोपाठ आणखी एक बँक संकटात; 90 वर्षे जुनी बँक डबघाईला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 04:02 PM2020-03-14T16:02:01+5:302020-03-14T16:07:27+5:30

आर्थिक अडचणीत सापडलेल्या येस बँकेची अवस्था सध्या अतिशय गंभीर आहे. भरमसाठ वाटलेली कर्जे बुडाल्यानं बँक अडचणीत सापडलीय. त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध लादले आहेत.

येस बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं पुनर्गठन योजनेची तयारी केलीय. या योजनेअंतर्गत एसबीआयनं येस बँकेतला ४९ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

एसबीआयसोबतच ऍक्सिस, कोटक महिंद्रा, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँकांनीसुद्धी येस बँकेत गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय.

येस बँकेप्रमाणेच देशातील आणखी एक बँकदेखील संकटात सापडलीय. ही बँक ९० वर्षांहून जुनी आहे.

खासगी क्षेत्रातल्या लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. बँकेचा कॅपिटल ऍडिक्वेसी रेशिओ (सीएआर) मोठ्या प्रमाणात घसरला आहे. बँकेचा कॅपिटल ऍडिक्वेसी रेशिओ किमान ९ टक्के असायला हवा. लक्ष्मी विलास बँकेचा कॅपिटल ऍडिक्वेसी रेशिओ ३.४६ टक्क्यांवर आलाय.

बँकेकडील ठेवी सीएआरच्या माध्यमातून मोजल्या जातात. बँक किती जोखीम पत्करू शकते, याची टक्केवारी सीएआरमधून समजते.

लक्ष्मी विलास बँकेत हिस्सा खरेदी करण्यासाठी अनेक गुंतवणूकदार प्रयत्नशील आहेत. यामध्ये कोटक बँकेचादेखील समावेश आहे.

आरबीआयनं गेल्या वर्षी लक्ष्मी विलास बँकेवर कठोर कारवाई केली होती. बँकेवर काही निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. याशिवाय नवी शाखादेखील उघडू शकत नाही.

आरबीआयनं लक्ष्मी विलास बँकेला पीसीए फ्रेमवर्कमध्ये टाकलं. एखाद्या बँकेचं उत्पन्न अतिशय कमी असल्यास, तिचं बुडित खात्यात गेलेलं कर्ज वाढल्यावर अशा प्रकारची कारवाई होते.

लक्ष्मी विलास बँकेनं मध्यंतरी इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्ससोबत विलनीकरण करण्याची तयार केली होती. याबद्दलचा प्रस्ताव बँकेनं आरबीआयला पाठवला. मात्र आरबीआयनं प्रस्ताव फेटाळून लावला.

लक्ष्मी विलास बँकेच्या देशात ५६९ शाखा असून १०४६ एटीएम आहेत. तर इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्सच्या देशभरात २२० हून अधिक शाखा आहेत.