वय 93 वर्षे अन् संपत्ती रु. 65800 कोटी, जाणून घ्या बेनू गोपाल बांगूर यांची यशोगाथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 05:05 PM2024-09-01T17:05:12+5:302024-09-01T17:13:15+5:30

93 वर्षीय बेनू गोपाल बांगूर 65,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह हुरुनच्या यादीतील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आहेत.

Hurun India Rich List 2024 : हुरुन इंडिया रिच लिस्ट (Hurun India Rich List 2024) मध्ये दिग्गज उद्योगपती बेनू गोपाल बांगूर (वय 93) यांचे नाव श्रीमंत लोकांच्या टॉप-100 यादीत सामील आहे. बांगूर हे पश्चिम बंगालमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. देशातील सिमेंट क्षेत्रात त्यांचे खूप मोठे नाव असून, ते बांगूर श्री सिमेंटचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. 65,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले बेनू गोपाल बांगूर हुरुनच्या यादीतील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आहेत.

बांगूर श्री सिमेंटचे कार्यकारी अध्यक्ष बेनू गोपाल बांगूर यांना अब्जाधीश बाबू मोशाय म्हणूनही ओळखले जाते. हुरुनने भारतातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांना 32 व्या क्रमांकावर ठेवले आहे. कोलकाता येथील 93 वर्षीय बेनू गोपाल बांगूर यांची नेट वर्थ 65,800 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, यावर्षी आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, संपत्तीच्या बाबतीत बेनू गोपाल बांगूर हे एनआर नारायण मूर्ती आणि नुस्ली वाडिया सारख्या मोठ्या अब्जाधीशांपेक्षाही पुढे आहेत.

बांगूर समूह हे देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. बेनू गोपाल बांगूर यांचे आजोबा मुंगी राम बांगूर आणि त्यांचे भाऊ राम कूवर बांगूर, यांनी 1919 मध्ये कंपनीची स्थापना केली होती. तर, श्री सिमेंटची स्थापना 1979 साली जयपूर, राजस्थान येथे झाली. बेनू गोपाल बांगूर यांचा जन्म 1931 साली झाला आणि त्यांना व्यवसायाचे कौशल्य वारशाने मिळाले. बांगूर समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला असून 1991 मध्ये त्याचे पाच विभाग करण्यात आले, त्यापैकी सिमेंट क्षेत्राची जबाबदारी बेनू गोपन बांगूर यांच्याकडे सोपवण्यात आली.

बेनू गोपाल बांगूर यांनी 1992 मध्ये श्री सिमेंटचे चेअरमन म्हणून पदभार स्वीकारला आणि त्यांच्या वारशाने मिळालेल्या व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन श्री सिमेंटला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. जसजसा त्यांचा व्यवसाय विस्तारत गेला, तसतशी त्यांची संपत्तीही रॉकेट वेगाने वाढत गेली आणि देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांचा समावेश झाला.

त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या वाढीचा अंदाज यावरून लावता येतो की, आज श्री सिमेंटचे बाजारमूल्य 92120 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, या शेअरने गेल्या दोन दशकांत 30 ते 25500 रुपयांपर्यंतचा प्रवास केला आहे. म्हणजे बेनू गोपाल यांच्या संपत्तीत वाढ झाल्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत.

6 जुलै 2001 रोजी श्री सिमेंटच्या एका शेअरची किंमत 30.30 रुपये होती, जी शुक्रवारी(दि.30) शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी 25,531 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, गुंतवणूकदारांना 23 वर्षांत 84,160.73 टक्के परतावा मिळाला आहे.

बेनू गोपाल बांगूर मूळ कोलकाता येथील रहिवासी आहेत. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून बी.कॉमची पदवी मिळवली. वयाच्या या टप्प्यावर पोहोचल्यानंतर 2002 पासून त्यांच्या सिमेंट व्यवसायाची धुरा त्यांचा मुलगा हरी मोहन बांगूर यांच्याकडे सोपवली. हरि मोहन यांनी आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. हुरुन श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या बेनू गोपाल बांगुप आपल्या कुटुंबासह कोलकाता येथील एका आलिशान हवेलीत राहतात. फोर्ब्सच्या मते, त्यांची हवेली अंदाजे 51,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे.