Air India कात टाकतेय! Airbus करतेय Tata शी चर्चा; मोठी विमाने ताफ्यात येणार? By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 01:20 PM 2022-03-22T13:20:02+5:30 2022-03-22T13:25:14+5:30
आताच्या घडीला टाटा कंपनी एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअर एशिया इंडिया या भारतीय विमानसेवांचे संचालन करते. Air India ची अलीकडेच Tata ग्रुपमध्ये घरवापसी झाली आहे. यानंतर एअर इंडियामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. व्यवस्थापन, संचालन यामध्ये टाटा समूह आक्रमकपणे बदल करत असून, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे.
टाटा समूहाने नटराजन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत १०० हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यासह विविध समूह ऑपरेटिंग कंपन्यांच्या मंडळाचे प्रमुख देखील आहेत.
यानंतर आता Airbus ने Tata शी चर्चा सुरू केली असून, एअरबसच्या मोठ्या विमानांच्या व्यवहाराबात बोलणी झाल्याचे सांगितले जात आहे. एअरबसचे अध्यक्ष आणि एमडी (भारत आणि दक्षिण आशिया) रेमी मेलार्ड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Tata समूह Air India, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअर एशिया इंडियासह चार भारतीय विमानसेवा चालवते. A350XWB, एअरबसच्या आकाराच्या विस्तृत विमानात मोठी इंधन टाकी आहे. त्यामुळे ते लहान विमानांपेक्षा जास्त अंतर कापू शकतात.
A350XWB विमान करारासाठी एअरबस टाटा आणि इतर भारतीय एअरलाइन्सशी बोलणी करत आहे का, असे विचारले असता, मेलार्ड म्हणाले की, सर्व एअरलाइन्सशी बोलणी सुरू आहेत. एअर इंडियाचे नवे मालक Tata हे आधीच एअरबसचे ग्राहक आहेत. टाटा हे संरक्षण व्यवसायात एअरबसचे भागीदारही आहेत, असे मेलार्ड यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात Tata सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले होते की, टाटा समूह एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमान वाहतूक कंपनी बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. विमानांच्या ताफ्यात सुधारणा करण्याबाबतही ते बोलले होते. एअरबस इंडियाचे म्हणणे आहे की, G20 देशांमध्ये भारत ही सर्वात उदयोन्मुख विमान वाहतूक बाजारपेठ असेल.
टाटा समूह एअर इंडियाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल. एअर इंडियाची जवळपास सर्व विमाने अद्ययावत केली जातील. एअर इंडिया एअरलाइन्सला आंतरराष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वांत हायटेक एअरलाइन बनवले जाईल, असा विश्वास एन. चंद्रशेखरन यांनी व्यक्त केला आहे.
एअर इंडियाला पुन्हा सर्वोत्तम बनवण्यासाठी कंपनीची पुनर्रचना केली जाईल. एअर इंडिया आपली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उंची आणखी वाढवेल. भारताला जगाच्या प्रत्येक भागाशी जोडण्याचा आमचा उद्देश आहे, असे एन. चंद्रशेखरन यांनी नमूद केले.
दरम्यान, वाइड बॉडी विमानांची मागणी कायम आहे. जागतिक सरासरी ३.९ टक्क्यांच्या तुलनेत भारताची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीत ६.२ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. सोमवारी एअरबस इंडियाने A350 विमान प्रदर्शित केले. यामध्ये ४८० हून अधिक प्रवासी चढू शकतात. त्याच वेळी, ते न थांबता १८ हजार किमीपर्यंत प्रवास करू शकते.