अलर्ट! KYC अपडेशनच्या नावाखाली मोठा स्कॅम; SBI नं दिला इशारा, 'हे' काम केल्यास अकाऊंट होणार रिकामं By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:17 AM 2021-08-02T09:17:55+5:30 2021-08-02T09:22:02+5:30
Online KYC Fraud : गेल्या काही काळापासून ऑनलाइन KYC च्या नावाखाली सुरुये फ्रॉड. KYC अपडेट करण्याच्या नावाखाली घेतली जातेय लोकांच्या बँक अकाऊंट्सची माहिती. कोरोना काळात सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर फ्रॉड निरनिराळ्या प्रकारे लोकांना आपला निशाणा बनवताना दिसत आहेत.
गेल्या काही काळापासून KYC Updation च्या नावाखाली हा फ्रॉड सुरू आहे. अशातच सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेनं आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे.
एका युझरनं स्टेट बँकेला त्याच्या मोबाईलवर आलेला मेसेज ट्वीट केला आहे. "मला एक संदेश आला आहे. तुमचं एसबीआय अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. अशातच तुम्ही तुमचं KYC अपडेट करा," असं सांगण्यात आल्याचं युझरनं म्हटलं आहे.
या ट्वीटला एसबीआयनं उत्तर देताना माहिती दिली आहे. कोणत्याही अकाऊंट होल्डरला जर अशाप्रकारचा कोणताही ईमेल किंवा एसएमएस, तसंच फोन कॉल आला अथवा लिंक शेअर करण्यात आली, तर यापासून सावध राहा, असं स्टेट बँकेनं म्हटलं आहे.
याशिवाय अशा प्रकारच्या कोणत्याही फोन कॉल्सला किंवा मेसेजवर आपली वैयक्तीक माहिती शेअर करू नका. विशेषकरून तुमचा युझर आयडी, पासवर्ड आणि डेबिट कार्ड क्रमांक तसंच PIN/ CVV/ OTP यासाखी माहिती बिलकूल शेअर करू नका असंही त्यांनी नमूद केलं आहे.
जर अशाप्रकारचे कोणतेही संदेश आले तर त्याची तक्रार मेलद्वारे report.phishing@sbi.co.in यावर करता येऊ शकते.
तसंच यासाठी 155260 या हेल्पलाईन क्रमांकावरही कॉल करता येऊ शकतो. याची तक्रार लोकल एन्फोर्समेंटमध्येही करता येऊ शकते, असं स्टेट बँकेनं म्हटलं आहे.
फोन कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे कोणीही आपली वैयक्तिक माहिती जसं की बर्थ डेट, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युझर आयडी, पासवर्ड आणि डेबिट कार्ड पिन, सीव्हीही, ओटीपी यांची माहिती कोणालाही देऊ नये, असं बँकेनं म्हटलं आहे.
फ्रॉड करणारे लोकं स्वत:ला एसबीआय, सरकारी कर्मचारी, पोलीस किंवा केव्हायसी अधिकारी सांगून संपर्क साधतात किंवा मेसेज ईमेल करू शकतात. अशात तुम्ही कोणतीही माहिती देऊ नका.
आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारे माहित नसलेल्या सोर्सवरून अॅप डाऊनलोड करू नका. असे अॅप टेलिफोन कॉल्स किंवा ईमेलवर आधारित असू शकतात. यापासून वाचण्याची गरज आहे.
जर कोणत्याही प्रकारचा माहित नसलेल्या सोर्सहून ईमेल किंवा मेसेज आल्यास त्यावर क्लिक करू नये. त्यापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
फोनवर ग्राहकांना लुभावणाऱ्या ऑफर्सचे मेसेज येऊ शकतात. अशातच त्या कितीही आकर्षक असल्या तरी त्याचे परिणाम धोकादायक ठरू शकतात. असे मेसेज ईमेल, एसएमएस आणि अन्य सोशल मीडियाद्वारे ग्राहकांना पाठवले जाऊ शकतात.