Amazon Deal with Vodafone: अचूक टायमिंग! जेफ बेझोस भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतणार; पुन्हा Jio सोबत प्राईस वॉर सुरु होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 01:22 PM2022-06-02T13:22:04+5:302022-06-02T13:30:25+5:30

Amazon Deal with Vodafone idea: २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओ आली तेव्हा भारतात ८ मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. आता चारच उरल्यात. त्यातही व्होडाफोन आयडिया कंगाल झाली आहे. त्यात परत ५जी येत आहे.

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या तीन व्यक्तींमध्ये असलेले अॅमेझॉ़नचे मालक जेफ बेझोस भारतातील टेलिकॉम क्षेत्रात पैसा ओतण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुन्हा एकदा प्राईस वॉर सुरु होण्याची शक्यता असून रिलायन्स जिओला फटका बसण्याची शक्यता आहे.

बेझोस यांनी आधीच फ्युचर ग्रुपच्या डीलवरून रिलायन्सला दणका दिला आहे. यामुळे भविष्यात बेझोस विरोधात मुकेश अंबानी अशी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. यामुळेच बेझोस यांचा टेलिकॉम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

व्होडाफोन आयडिया ही कंपनी ऑगस्ट २०२१ मध्ये दिवाळखोरीत जाण्याच्या वाटेवर होती. जवळ जवळ बंद पडते की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली होती. Vi वर स्पेक्ट्रम फीचे 96,300 कोटी आणि एजीआर फीचे 61,000 कोटी आणि बँकांचे 21,000 कोटींचे कर्ज होते.

व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची भरती सुरु केली आहे. मेच्या अखेरीस कंपनीच्या शेअर्समध्ये देखील वाढ दिसून आली. तसेच यंदा कंपनीचे ग्राहकही वाढले आहेत. तर जिओचे ग्राहक कमी होऊ लागले आहेत.

अॅमेझ़ॉन व्होडाफोन आयडियामध्ये गुंतवणूक करण्याची चर्चा जोरावर आहे. बेझोस लवकरच व्होडाफोनसोबत २० हजार कोटी रुपयांची डील करण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सनुसार व्होडाफोन बेझोस यांना १० हजार कोटींचा हिस्सा विकणार आहे. तसेच त्यांच्याकडून आणखी १०००० कोटी रुपये कर्ज म्हणून घेणार आहे.

२३ मे २०२२ ला Vi चे संचालक रविंदर ठक्कर यांनी याचे संकेत दिले आहेत. अॅमेझॉनसोबत डील जवळजवळ पक्की झाली आहे. यामुळे व्होडाफोन स्पर्धेत राहू शकते असे ते म्हणाले.

देशात काही महिन्यांत ५ जी येणार आहे. अशावेळीच अॅमेझॉनसारखा तगडा गडी पैसे ओतणार असल्याने त्याचा फायदा सर्वच ग्राहकांना होणार आहे. २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओ आली तेव्हा भारतात ८ मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. मात्र, २०१७ मध्ये टेलीनॉर, 2018 मध्ये एअरसेल आणि २०१९ मध्ये टाटा डोकोमो बंद झाल्या. तर याच काळात व्होडाफोन-आयडिया मर्ज झाल्या आहेत.

भारतीय बाजारात स्पर्धा कमी झाली आणि उरलेल्या कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढविण्यास सुरुवात केली. मात्र, अॅमेझॉनमुळे व्होडाफोन बॅटफुटवरून पुन्हा स्पर्धेत येणार आहे. यामुळे ग्राहक वाढविण्यासाठी डेटा टेरिफ कमी केले जाऊ शकतात.

अॅमेझॉ़नला त्यांच्या क्लाऊड सेवेसाठी व्होडाफोनचे डेटा सेंटर्स वापरण्यास मिळतील. व्होडाफोनचे फायबर नेटवर्कही मिळेल. बेझोस यांना टिअर २ शहरांमध्ये जायचे आहे, यासाठी ते व्होडाफोनच्या ७० डेटा सेंटर्सचा फायदा उठविणार आहेत.