अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी बीकेसीतील हॉटेल्स बुक; एका रात्रीचे भाडे तब्बल ₹1 लाख...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:55 PM2024-07-08T18:55:19+5:302024-07-08T18:59:06+5:30

Anant Ambani Radhika Merchant Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.

Anant Ambani Radhika Merchant Wedding: रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश, यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट येत्या 12 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात असलेल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. या आलिशान सोहळ्यात देश विदेशातील शेकडो पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

अंबानी कुटुंबातील या शाही लग्न सोहळ्यामुळे मुंबईतील मोठमोठ्या हॉटेल्सची मागणीदेखील वाढली आहे. बीकेसी भागातील बहुतांश फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या खोल्या बुक झाल्या आहेत. ट्रॅव्हल आणि हॉटेल बुकिंग वेबसाइट्सनुसार, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात अशी दोन पंचतारांकित हॉटेल्स आहेत, जिथे सर्व खोल्या आधीच बुक झाल्या आहेत.

यातील एका हॉटेलमध्ये 14 जुलै रोजीचे, म्हणजेच एका दिवसाचे भाडे तब्बल ₹91,350+Tax रुपयांवर पोहोचले आहे. इतर दिवशी या हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी फक्त ₹13,000 रुपये मोजावे लागतात.

BKC मधील प्रसिद्ध हॉटेल ट्रायडेंट मध्ये सिंगल रुमचे एका रात्रीचे दर 9 जुलै रोजी ₹10,250+tax, 15 जुलै रोजी ₹16,750+Tax आणि 16 जुलै रोजी ₹13,750+ Tax दाखवत आहे.

तसेच, 10 जुलै ते 14 जुलै पर्यंत एकही खोली उपलब्ध नाही. पण, या तारखांना ग्रँड हयात, ताज सांताक्रूझ, ताज बांद्रा आणि सेंट रेजिस सारख्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये 14 जुलैपर्यंत रुम्स उपलब्ध आहेत.

12 जुलैपासून अनेक सेलिब्रिटी या भव्य विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अनंत आणि राधिकाचे लग्न 12 जुलैला असून, 12 जुलै रोजी आशीर्वाद सोहळा आणि 14 जुलै रोजी रिसेप्शन आयोजित केले आहे.

लग्नातील पाहुणे नेमकं कुठे राहतील, याची अधिकृत माहिती समोर आली नाही. पण, BKC आणि आसपासच्या भागातील हॉटेलचे दर वाढल्यामुळे, याच हॉटेल्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केल्याची शक्यता आहे.