प्रसिद्धीपासून खूप दूर असते मुकेश अंबानींची लहान बहीण, कोण आहेत त्या? पाहा किती आहे त्यांची नेटवर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 09:00 AM2024-07-10T09:00:33+5:302024-07-10T09:18:18+5:30

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी पार पडणार आहेत. यानिमित्तानं अनेक जण मुबंईत दाखल झालेत. यापैकीच एक म्हणजे मुकेश अंबानी यांची धाकटी बहीण दीप्ती. जाणून घेऊया कोण आहेत त्या?

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह (Anant Ambani Radhika Merchant Wedding) सोहळा १२ जुलै रोजी मुंबईत पार पडणार आहे. मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियामध्ये सोमवारी रात्री हळदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं.

या सोहळ्यात अंबानी कुटुंबातील अनेक सदस्य सहभागी झाले होते. त्यात मुकेश अंबानी यांची धाकटी बहीण दीप्ती साळगावकर यांचाही समावेश होता. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे चिरंजीव मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या दीप्ती आणि नीना या दोन बहिणींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. याचं कारण म्हणजे दोन्ही बहिणी नेहमीच चर्चांपासून दूर राहतात.

दीप्ती साळगावकर या अंबानी कुटुंबात सर्वात धाकट्या. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९६२ रोजी झाला. गोव्यातील उद्योगपती दत्तराज साळगावकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. दीप्ती लाइमलाइटपासून दूर राहतात आणि त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाहीये.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण नेटवर्थ सुमारे एक अब्ज डॉलर्स आहे. त्यांचे पती दत्तराज साळगावकर हे गोव्यातील प्रसिद्ध व्यापारी आहेत. ते व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आणि एमडी आहेत. यासोबतच गोव्याचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब साळगावकरचेही ते मालक आहे. दत्तराज यांनी गोव्याच्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी जपण्यासाठी Sunaparanta स्थापना केली. दीप्ती साळगावकर या संस्थेच्या उपाध्यक्ष व सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.

दीप्ती आणि दत्तराज साळगावकर यांची कन्या इशिता साळगावकर या देखील उद्योजक आणि बिझनेसवुमन आहेत. त्यांचे अनेक व्यावसायिक उपक्रम आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्या साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, इशिता यांनी २०१६ मध्ये नीरव मोदीचा धाकटा भाऊ नीशल मोदीसोबत विवाह केला होता. पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. घटस्फोटानंतर इशिता यांनी २०२२ मध्ये नेक्सजू मोबिलिटीचे संस्थापक अतुल्य मित्तल यांच्याशी विवाह केला. अतुल्य स्टील टायकूल हे लक्ष्मी मित्तल यांचे पुतणे असून ते एक यशस्वी उद्योजक आहेत.