Anant-Radhika यांचा ५००० कोटींचा विवाह, जगातील सेलिब्रिटींना एकाच व्यासपीठावर आणणारे CEO कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 09:50 AM2024-07-17T09:50:23+5:302024-07-17T10:01:41+5:30

Anant Ambani Radhika Merchant Wedding : रिपोर्ट्सनुसार, लग्नावर एकूण ५००० कोटी रुपये खर्च झाला होता, जो प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाच्या खर्चापेक्षाही जास्त आहे.

मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्हमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. तीन दिवस चाललेल्या या शाही सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. रिपोर्ट्सनुसार, लग्नावर एकूण ५००० कोटी रुपये खर्च झाला होता, जो प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाच्या खर्चापेक्षाही जास्त आहे.

अंबानी कुटुंबातील नवीन सदस्य राधिका मर्चंट यांनी नीता अंबानी यांचं आपल्या विवाहसोहळ्याच्या सीईओ म्हणून वर्णन केलं आहे. 'वोग'शी नुकत्याच झालेल्या एका संवादात त्यांनी नीता अंबानी यांच्या समर्पण आणि दूरदर्शी नेतृत्वाबद्दल भाष्य केलं. त्यांच्यामुळेच देशविदेशातील सर्व सेलिब्रिटी एकाच मंचावर आल्याचं त्या म्हणाल्या.

अनंत आणि राधिका यांचा विवाहसोहळा तीन दिवस चालला. १२ जुलै रोजी सुरू झालेल्या या विवाहसोहळ्याचा समारोप १५ जुलै रोजी कर्मचाऱ्यांच्या स्वागत समारंभानं झाला. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, अँटिलिया, सी विंड, करुणा सिंधू आणि इतर अंबानी निवासस्थानांच्या कर्मचाऱ्यांना रिसेप्शनसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. यामध्ये हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीममधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या विवाहसोहळ्यापेक्षा या भव्य विवाहाचा खर्च अधिक होता. याची अंदाजित किंमत सुमारे १६.३ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १,३६१ कोटी रुपये होती. अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च आला होता.

या भरमसाठ खर्चात प्री-वेडिंग फंक्शन्सचाही समावेश आहे. एकूण खर्चापैकी ३० कोटी डॉलर्स केवळ प्री-वेडिंग फंक्शन्सवर खर्च करण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. यात लक्झरी क्रूझवर केटी पेरी आणि बॅकस्ट्रीट बॉईज सारख्या स्टार्सच्या परफॉर्मन्सचाही समावेश होता.

लग्नादरम्यान अंबानी कुटुंबातील महिलांनी परिधान केलेले दागिनेही खूप चर्चेत होते. नीता अंबानी यांचा ४०० ते ५०० कोटी रुपयांचा पन्ना डायमंड नेकलेस आणि तेवढ्याच रकमेचा श्लोका अंबानी यांचा नेकलेसही इंटरनेटवर गाजला.

राधिका मर्चंट यांनी आपल्या सासू नीता अंबानी यांना ५००० कोटी रुपयांच्या या लग्नाचं सीईओ म्हटलं आहे. 'वोग'शी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "माझ्या सासू या विवाहसोहळ्याच्या सीईओ होत्या. नीता अंबानी यांची बांधिलकी आणि दृरदृष्टी यांनी या उत्सवाला एक वेगळा रंग दिला," असं म्हणत ईशा आणि श्लोका अंबानी यांनीही या प्लॅनिंगमध्ये मोठी मदत केल्याचं त्या म्हणाल्या. धोरणात्मक पद्धतीनं विवाहाच्या तारखांची निवड करण्यात आली होती. १२, १३ आणि १४ जुलैच्या तारखा त्यांच्या कौटुंबिक पुजाऱ्यांच्या सल्ल्यानुसार निवडण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.