Aadhaar शी निगडीत कोणतंही काम होणार झटपट, UIDAI ची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 01:27 PM2022-08-23T13:27:12+5:302022-08-23T13:35:57+5:30

आधारशी निगडीत सेवांना गती देण्यासाठी आणि त्याच्याशी निगडीत समस्यांचं निराकरण करण्याच्या उद्देशानं UIDAI नं मोठा निर्णय घेतला आहे.

आधार कार्ड सध्या एका महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे बनलं आहे. सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा बँक, तसंच अन्य काही महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे.

परंतु ज्या तेजीनं सध्या आधार कार्डाची गरज वाढ आहे, त्याच्याशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी आधार सेवा केंद्रांची संख्या मात्र मर्यादित आहे. ही बाब ध्यानात घेता. युआयडीएआयनं मोठा प्लॅन तयार केला आहे. यानुसार देशातील मोठ्या शहरांमध्ये अनेक आधार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

UIDAI देशातील ५३ शहरांमध्ये ११४ आधार सेवा केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही सर्व आधार केंद्रे मेट्रो सिटी, सर्व राज्यांच्या राजधान्या आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये सुरू केली जातील. सध्या देशात सुरू असलेल्या आधार सेवा केंद्रांची एकूण संख्या ८८ इतकी आहे. त्या वाढवण्याची आता तयारी केली जात आहे.

देशात आधार सेवा केंद्रांशिवाय ३५ हजारांपेक्षा अधिक आधार सेंटर्सही सुरू आहेत. त्यांचं कामकाज बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारांद्वारे करण्यात येत आहे. नवीन आधार कार्ड तयार करायचं असेल किंवा त्यात कोणता बदल करायचा असेल तर या केंद्रांद्वारे आठवड्याचे सातही दिवस सेवा घेता येऊ शकते. सुट्टीच्या दिवशीही ही केंद्रे सकाळी साडेनऊ ते साडेपाच या कतालावधीत सुरू असतात.

याद्वारे तुम्ही सहजरित्या आपले बायोमॅट्रिकशी निगडीत कामं, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ईमेल आयडी अपडेट करू शकता. नवीन आधार कार्ड तयार करम्यासाठी कोणतंही शुल्क घेतलं जात नाही. बायोमॅट्रिक अपडेटसाठी १०० रूपये, नाव-पत्ता-जन्मतारीख अपडेट करण्यासाठी ५० रूपये, मुलांचे बायोमॅट्रिक अपडेट करण्यासाठई कोणतंही शुल्क घेतलं जात नाही.

जर तुम्ही कोणत्याही आधार केंद्रांमध्ये आधार अपडेटसाठी गेलात आणि त्या ठिकाणी ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे मागितले गेले, तर अशा स्थितीत तुम्ही तक्रारही करू शकता. तुम्ही uidai.gov.in वर मेलद्वारे किंवा १९४७ या क्रमांकावर कॉल करून तक्रार दाखल करू शकता.