Arvind Kejriwal News: १२ हजार कॅश, ४० हजारांची चांदी... किती आहे दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल यांची नेटवर्थ? By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 08:32 AM 2024-09-14T08:32:31+5:30 2024-09-14T08:51:11+5:30
Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांच्या नावे ना घर आहे, ना कार. परंतु केजरीवाल यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊया. Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दारु घोटाळ्याशी संबंधित सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. हरयाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाल्याचं म्हटलं जातंय. केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी अटक केली होती.
दहा दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना १ एप्रिल रोजी तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं. याच प्रकरणी सीबीआयनं त्यांना २६ जून रोजी अटक केली. त्यावेळी ते तिहार तुरुंगात होते. ईडीशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना १२ जुलै रोजी जामीन मंजूर केला होता. आता सीबीआय प्रकरणातही त्यांना जामीन मिळाला आहे. केजरीवाल यांच्याकडे किती संपत्ती आहे आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केजरीवाल यांचं मासिक वेतन ४ लाख रुपये आहे. २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, केजरीवाल यांची संपत्ती सुमारे ३.४४ कोटी रुपये आहे.
मुख्यमंत्री म्हणून त्यांना अनेक सोयी-सुविधा मिळतात. यामध्ये कार आणि सुरक्षेचा समावेश आहे. त्यांना प्रवास भत्ता आणि राहण्याची सुविधाही मिळते. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती २.१ कोटी रुपये असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पाच वर्षांत त्यांच्या एकूण उत्पन्नात १ कोटी ३० लाखांनी वाढ झाली आहे.
केजरीवाल यांच्या नावे घर नाही. ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहतात. त्यांच्या बंगल्यावरूनही बराच वाद झाला होता. कोरोना काळात केजरीवाल यांच्या बंगल्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा भाजपचा आरोप आहे. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याकडे एक कोटी रुपयांचा बंगला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी सुनीता केजरीवाल यांचा बंगला हरियाणातील गुरुग्राममध्ये आहे. २०१० मध्ये त्यांनी ही प्रॉपर्टी सुमारे ६० लाख रुपयांना खरेदी केली होती. केजरीवाल यांच्याकडे केवळ १२ हजार रुपये आणि त्यांच्या पत्नीकडे ९ हजार रुपयांची रोकड आहे.