बँक कर्मचारी अवेळी लंच टाईम, टोलवाटोलवी करू शकत नाहीत; ग्राहक म्हणून तुम्हाला हे अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 10:23 AM2022-07-21T10:23:37+5:302022-07-21T10:29:47+5:30

Bank customer: ग्राहकांना बँकिंग सेवेशी संबंधीत काही अधिकार मिळालेले आहेत. याची माहिती आपल्यासारख्या अनेकांना नसल्याने त्याचा फायदा उठविला जातो.

बँक कर्मचाऱ्यांचे एकसोएक किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. अनेकदा तर आपल्यालाच त्याचा अनुभव आलेला असतो. पैसे भरायला किंवा काढायला गेलात तर लंट टाईम, इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी मारत बसणे आदी गोष्टी घडतात.

यामुळे आपल्याला वेळ लागतो. लंच टाईम नंतर या असेही अनेकदा सांगितले जाते. अशी जर टोलवाटोलवी झाली किंवा या टेबलवरून त्या टेबलवर जाण्यास सांगितले तर तुम्ही ग्राहक म्हणून एका अधिकाराचा वापर करू शकता.

ग्राहकांना बँकिंग सेवेशी संबंधीत काही अधिकार मिळालेले आहेत. याची माहिती आपल्यासारख्या अनेकांना नसल्याने त्याचा फायदा उठविला जातो. बँकाही कुठे हे अधिकार ठळकपणे लिहून ठेवत नाहीत, यामुळे आपल्याला बँकेत गेल्यावर नाहक त्रास सहन करावा लागतो.

बँक जर तुमच्याशी योग्य वागली नाही तर तुम्ही याची तक्रार थेट रिझर्व्ह बँकेकडे करू शकता. तसेच बँक लोकपालाकडे याची तक्रार करू शकता. तुमच्या तक्रारीवर नक्कीच कार्यवाही केली जाते.

जर एखाद्या बँक कर्मचाऱ्याने कामात दिरंगाई केली तर तुम्ही त्याची तक्रार तिथेच असलेल्या बँक मॅनेजरकडे किंवा नोडल ऑफिसरकडे करू शकता. आजवर शांत बसला, बुक्क्यांचा मार सहन केलात म्हणून अनेकदा तुम्हाला बँकेत जाणे म्हणजे त्रासाचे असते असा अनुभव आला असेल.

ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक बँकेत ग्रीवेंस रिड्रेसल फोरम असतात. याद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीचे निरसन करू शकता. तुमचा वेळ जातो, नाहक मनस्ताप होईल म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, यामुळे काळ सोकावतो. तुम्ही तक्रार केली, तुमच्या आधी कोणी केली असेल किंवा नंतर केली असेल तर त्या कर्मचाऱ्याचे वागणे चुकीचे आहे हे देखील वरच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येते. एकदा ती चूक परंतू, वारंवार होणारी ही चूक नसते.

तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात, त्या बँकेत जर तुमच्यासोबत असा प्रकार घडला तर तुम्ही Grievance Redressal Number किंवा बँकेच्या टोल फ्री नंबरवर तक्रार करू शकता. काही बँका या ऑनलाईन तक्रारी देखील स्वीकारतात. काही बँका या सोशल मीडियावरून देखील तक्रारींची दखल घेतात.

जर तुम्हाला बँकिंग लोकापालकडे तक्रार करणे जमले नाही तर तुम्ही आरबीआयकडे ऑनलाईन तक्रार करू शकता. यासाठी https://cms.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन File A Complaint वर तक्रार नोंदवू शकता.

हे जरी नाही जमले तर तुम्ही आरबीआयला CRPC@rbi.org.in या मेलआयडीवर तक्रार करू शकता. याशिवाय 14448 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही तक्रार नोंदवू शकता.