केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:04 AM2024-10-26T10:04:43+5:302024-10-26T10:16:40+5:30

Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. आजकाल बरेच जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळू लागलेत.

Investment Tips : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची असते. आजकाल बरेच जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळू लागलेत. यात जोखीम जरी अधिक असली तरी त्यातून मिळणारा परतावा हा अधिक असल्यामुळे गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत. जर तुमचा पगार चांगला असेल आणि तुम्हाला बचत, गुंतवणुकीचं महत्त्व नीट समजत असेल तर कोट्यधीश बनणं तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही.

कोट्यधीश होण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागते आणि अशा योजनेत गुंतवणूक करावी लागते ज्यात तुम्हाला चांगला परतावा मिळतो. आजच्या काळात एसआयपी म्युच्युअल फंड (Mutual Fund) ही अशी योजना आहे ज्याचा दीर्घ मुदतीत सरासरी परतावा १२ टक्क्यांच्या आसपास असल्याचं मानलं जातं.

हा परतावा इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत अधिक आहे. कंपाउंडिंगच्या फायद्यामुळे तुम्ही या योजनेतून दीर्घ काळासाठी मोठे पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला असा मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतःला अवघ्या १५ वर्षात कोट्यधीश बनवू शकता. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केली तर वयाच्या ४० व्या वर्षी तुम्ही कोट्यधीश बनू शकता. जाणून घ्या कसं?

वयाच्या ४० व्या वर्षी कोट्यधीश बनवण्यासाठी १२-१५-२० फॉर्म्युला तुम्हाला खूप उपयुक्त ठरू शकतो. या सूत्रात १२ म्हणजे १२ टक्के परतावा, १५ म्हणजे १५ वर्षांसाठी गुंतवणूक आणि २० म्हणजे महिन्याला २० हजार रुपयांची गुंतवणूक. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी २०,००० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि ती १५ वर्षे चालू ठेवली, त्यात तुम्हाला या एसआयपीवर १२% परतावा मिळाला तर वयाच्या ४० व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल.

जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात दरमहा २०,००० रुपये जमा केले तर तुम्ही १५ वर्षांत एकूण ३६,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, १२ टक्के दराने तुम्हाला त्यावर ६४,९१,५२० रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे १५ वर्षांनंतर तुम्ही एकूण १,००,९१,५२० रुपयांचे मालक व्हाल.

एसआयपी ही मार्केट लिंक्ड स्कीम असल्यानं त्याचा परतावाही मार्केट बेस्ड असतो. यावर जर तुम्हाला १२% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर तुमचा नफा आणखी जास्त होऊ शकतो. समजा तुम्हाला १५ टक्के नफा झाला तर तुम्हाला ३६,००,००० च्या गुंतवणुकीवरील व्याजातून ९९,३७,२६२ रुपये मिळतील आणि १५ वर्षांनंतर तुम्हाला १,३५,३७,२६२ रुपये मिळतील.

आणखी एक गोष्ट मनात येते ती म्हणजे गुंतवणुकीसाठी २० हजार रुपये कसे जमवायचं? जर तुमचा पगार अधिक असेल तर तुम्ही अगदी सहजपणे महिन्याला २०,००० रुपये काढू शकता. आर्थिक नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या कमाईच्या किमान २० टक्के रक्कम गुंतवावी. १,००,००० रुपयांच्या २० टक्के म्हणजे २०,००० रुपये. अशावेळी तुम्ही गुंतवणुकीसाठी ही रक्कम सहज काढू शकता.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. म्युच्युअल फडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)