Vodafone- Idea ला मोठा धक्का, सरकार हिस्सेदारी विकणार? दूरसंचार कंपनीच्या अडचणी वाढणार? By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 05:34 PM 2024-08-14T17:34:53+5:30 2024-08-14T17:50:16+5:30
व्होडाफान-आयडिया कंपनीच्या अडचणी वाढणार आहेत. सरकारची व्होडाफोन-आयडिया कंपनीमध्ये २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे. Vodafone Idea कंपनी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. ही दूरसंचार कंपनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये कोसळण्याच्या मार्गावर होती. पण, सरकारने व्होडाफोन आयडियाच्या १६,१३३ कोटी रुपयांच्या थकबाकीच्या व्याजाचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली.
या रूपांतरणामुळे सरकारला २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीतील ३३ टक्के हिस्सा मिळाला.
सीईओ अक्षय मुंद्रा म्हणाले, 'आमचा हिस्सा विकण्याबाबत सरकारशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आमचा विश्वास आहे की सरकार, सार्वजनिक भागधारक म्हणून, आपल्या गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. हा आमच्या हस्तक्षेपाचा विषय नाही.
व्होडाफोन आयडियामध्ये सरकारची सध्या २३.१८ टक्के हिस्सेदारी आहे. गेल्या आठवड्यात, सरकार सार्वभौम वेल्थ फंडला आपला हिस्सा विकण्याचा विचार करत आहे, असा दावा करण्यात आला होता.
ही प्रक्रिया अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. याप्रकरणी अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरण, कतार गुंतवणूक प्राधिकरण आणि सिंगापूरचे टेमासेक यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे.
Vodafone Idea चे CEO मुंद्रा म्हणाले, 'या प्रकरणी मी एवढेच सांगू इच्छितो की, सरकारने आपले शेअरहोल्डिंग चालू ठेवावे, ते वळवावे की दुसरे काही करावे, ही त्यांची धोरणात्मक बाब आहे. कंपनी म्हणून या संदर्भात आमच्याकडे कोणतीही माहिती नाही.
३० जून २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, व्होडाफोन आयडियाकडे सरकारचे २.०९ लाख कोटी रुपये आहेत. यामध्ये स्थगित स्पेक्ट्रम पेमेंटसाठी १.३९ लाख कोटी रुपये शिल्लक आहेत. तसेच एडजेस्ट ग्रॉस रिव्हेन्यू दायित्व ७०,३२० कोटी रुपये आहे.
कंपनीने एजीआर थकबाकीबाबत न्यायालयाच्या जुन्या आदेशाविरोधात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. याबाबत मुंद्रा म्हणाले की, कंपनी या प्रकरणाच्या खुल्या सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे.