Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल; हिस्सा झाला कमी, शेअर्सही घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 09:43 AM2022-10-16T09:43:08+5:302022-10-16T09:47:23+5:30

Rakesh Jhunjhunwala stocks : दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये या तिमाहित मोठा बदल दिसून आला आहे.

Rakesh Jhunjhunwala stocks : दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठा बदल झाला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील कॅनरा बँकेच्या (Canara Bank) शेअरहोल्डिंगचे पॅटर्न समोर आले आहेत. त्यानुसार राकेश झुनझुनवाला यांची कॅनरा बँकेतील हिस्सेदारी कमी झाली आहे.

एप्रिल-जून तिमाहीत झुनझुनवाला यांचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतील हिस्सा 1.96 टक्के होता. सप्टेंबरच्या तिमाहीत तो 1.48 टक्क्यांवर आला आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले. शेअर बाजाराच्या जगात 'बिग बुल' आणि 'इंडियाज वॉरेन बफे' म्हणूनही त्यांची ओळख होती.

कॅनरा बँकेतील हा स्टेक राकेश झुनझुनवाला यांनी स्वत: विकला होता की त्यांच्या निधनानंतर विकला गेला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही. एप्रिल-जून या तिमाहीत झुनझुनवाला यांनी त्यांच्या होल्डिंगमध्ये कोणताही बदल केला नाही. जून तिमाहीत, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कॅनरा बँकेचे 3,55,97,400 शेअर्स होते. सप्टेंबरमध्ये हे 2,68,47,400 शेअर्सवर आले आहेत.

अलीकडच्या तिमाहीत कॅनरा बँकेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे शेअर्स सुमारे 235 रुपयांवरून 227 रुपयांपर्यंत घसरले आहेत. या कालावधीत गुंतवणूकदारांचे सुमारे 3.5 टक्क्यांचे नुकसान झाले आहे.

कॅनरा बँकेच्या स्टॉकच्या महिन्याभराच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, तो सुमारे 255 रुपयांवरून 227 रुपयांपर्यंत खाली आला आहे. या कालावधीत 10 टक्क्यांहून अधिक घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, या आठवड्यातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी शेअर्समध्ये वाढ झाली. ते दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढून 231 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. पण कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात ते 227 रूपयांवर बंद झाले.

दुसरीकडे, डेटानुसार झुनझुनवाला यांचा टाटा कम्युनिकेशन्समधील स्टेक सप्टेंबरच्या तिमाहीत वाढला आहे. 30 जून रोजी संपलेल्या तिमाहीत 1.08 टक्के असलेला हिस्सा सप्टेंबरच्या तिमाहीत 1.61 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5,000 रुपयांच्या प्रारंभिक भांडवलासह स्टॉक मार्केटमध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. सध्या, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यासह त्यांच्या इक्विटी पोर्टफोलिओची किंमत 33,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.