सोन्याच्या दरात मोठी घसरण, 6 हजार रुपयांनी झालंय स्वस्त; आता पुढे काय? एक्सपर्ट म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:50 PM2024-07-30T16:50:57+5:302024-07-30T17:02:00+5:30

"भारतातील सोन्यावरील आयात शुल्क कमी करून 6 टक्के करण्यात आले आहे. तर दुबईमध्ये सोने खरेदी केल्यास, 5 टक्के व्हॅट लगतो..."

गेल्या आठवड्यात सादर झालेला देशाचा अर्थसंकल्प सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी जबरदस्त ठरला. अर्थसंकल्पात आयात शुल्क कमी करण्यात आल्याने सोन्याचा दर सातत्याने कमी होताना दिसत आहे.

अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 6 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यापासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात 6 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला आहे.

तज्ज्ञांच्या मते, सरकारच्या या निर्णयानंतर, उद्योगात नक्कीच पारदर्शकता येईल. तसेच, सर्वसामान्यांनाही याचा फायदा होईल. पण प्रश्न आहे की, सोन्याचे भाव आणखी खाली येतील का? तर जाणून घेऊया...

इकोनॉमिक्स टाइम्सने UAE मध्ये व्यवसाय करणाऱ्या भारतीय ज्वेलर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आयात शुल्क कमी झाल्याने, भारतीय ग्रहकांची दुबईतून सोने खरेदी करण्याची इच्छा कमी होईल. तसेच देश आणि परदेशात सोन्यावर लागणाऱ्या शुल्कातील अंतर कमी झाल्याने, तसेच यामुळे भारतात सोन्याचा दरही कमी झाल्याने, मोठा फरक पडणार आहे. यामुळे परदेशातून, प्रामुख्याने दुबईतून सोने खरेदी करण्याला आळा बसेल.

याशिवया ईटीने पोपले अँड सन्सचे डायरेक्टर राजीव पोपले यांच्या हवाल्याने म्हटेल आहे, भारतातील सोन्यावरील आयात शुल्क कमी करून 6 टक्के करण्यात आले आहे. तर दुबईमध्ये सोने खरेदी केल्यास, 5 टक्के व्हॅट लगतो. अशात 1 टक्का एवढेच अंतर राहते. याची भरपाई मजुरीच्या खर्चातून केली जाऊ शकते.

महत्वाचे म्हणजे, भारतात मजुरीचा खर्च अत्यंत कमी आहे. तसेच, भारतात हॉलमार्किंग आणि HUID क्रमांक अनिवार्य झाल्याने, देशातील सोन्याच्या शुद्धतेसंदर्भातील चिंताही दूर झाली आहे.

काय म्हणतात एक्सपर्ट? HDFC सिक्योरिटीजचे करन्सी आणि कमोडिटी हेड अनुज गुप्ता यांच्या मते, सोन्याच्या दरात आता अधिक तेजी अथवा मंदीची शक्यता कमी आहे. कारण आता ऑगस्टचा एक्सपायरी सीझन आहे. तसेच, अमेरिकेत फेड रिझर्व्हची बैठकही होणार आहे. या बैठकीनंतरच सोन्याच्या दरावरील परिणाम दिसून येऊ शकतो. या कालावधीत सोन्याचा दर 67000-69000 दरम्यान राहू शकतो.

आता काय आहे सोन्याचा दर? - या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार बघायला मिळत आहे. मंगळवारीही (30 जुलै) कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या दरात अस्थिरता दिसून आली, मात्र धातू हिरव्या रंगावरच दिसत होते.

एमसीएक्स अर्थात मल्टी-कमोडिटी एक्स्चेंजवर आज सोने किंचित तेजीसह खुले झाल्यानंतर पुन्हा घसरले होते. मात्र, नंतर ते सुमारे 80 रुपयांनी वधारत 68,354 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते. काल ते 68,268 रुपयांवर बंद झाले होते.