मोठी बातमी : एप्रिलपासून सिलिंडर, सीएनजी, विजेसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:14 AM2022-02-23T09:14:14+5:302022-02-23T09:21:50+5:30

एप्रिलपासून बसणार मोठा फटका; जगभरात गॅसच्या टंचाईची झळ

जगभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतात एप्रिलमध्ये दिसून येणार आहे. गॅस टंचाईमुळे देशातील गॅसच्या किमती दुपटीने वाढू शकतात. त्यामुळे घरगुती सिलिंडर, सीएनजी आणि विजेच्या किमतीही वाढतील.

यासोबतच सरकारच्या खत अनुदानाच्या बिलातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या कहरातून बाहेर येत आहे आणि त्यासोबतच ऊर्जेची मागणीही वाढत आहे. परंतु २०२१ मध्ये त्याचा पुरवठा वाढवण्यासाठी पुरेशी पावले उचलली गेली नाहीत.

या कारणांमुळे गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आयात होणाऱ्या एलएनजीसाठी घरगुती उद्योग अगोदरपासूनच जास्त किंमत मोजत आहेत. वाढलेल्या कच्च्या तेलाचाही याच्याशी थेट संबंध असून, अनेक दिवसांपासून तेलाचे भाव भडकले आहेत.

या किंमतवाढीचा परिणाम एप्रिलमध्ये दिसून येईल. कारण सरकार एप्रिलमध्ये नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत बदल करणार आहे. उद्योग तज्ञ आणि विश्लेषक म्हणतात की, यात ६ ते ७ डॉलरने वाढ होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या म्हणण्यानुसार, खोल समुद्रातून काढण्यात येणाऱ्या गॅसची किंमत ६.१३ डॉलरने वाढून १० डॉलरवर जाईल.

देशातील घरगुती नैसर्गिक वायूच्या किमती दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये निश्चित केल्या जातात. एप्रिलची किंमत जानेवारी ते डिसेंबर २०२१ पर्यंतच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर आधारित असेल.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक एके जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत एक डॉलरने वाढ केल्याने सीएनजीच्या किमतीत ४.५ रुपये प्रति किलोने वाढ होईल. म्हणजेच सीएनजीच्या दरात किलोमागे १५ रुपयांनी वाढ होऊ शकते.

जेना म्हणाले की, सध्या पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी वाहनांची किंमत ५५ टक्के आहे. पेट्रोलचे दर वाढत राहिल्यास हा समतोल राखला जाईल. पण तेलाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या नाहीत तर, परिस्थिती वेगळी असेल. जर सीएनजीच्या किंमती वाढल्या तर सीएनजी वाहने घेण्याचा कोणताही फायदा होणार नाही.