मोठा दिलासा...! LPG गॅस सिलिंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला; जाणून घ्या, तुमच्या महानगरातील नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 08:39 IST2025-04-01T08:33:41+5:302025-04-01T08:39:10+5:30

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च २०२४ मध्ये शेवटची कपात करण्यात आली होती...

राजधानी दिल्लीपासून मु्ंबईपर्यंत देशातील सर्वच महानगरांमध्ये 1 एप्रिल 2025 पासून गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यानुसार, कॉमर्शिल गॅस सिलिंडरचे दर 40 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचा विचार करता, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मार्च २०२४ मध्ये शेवटची कपात करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर थिर आहेत. यात कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४१ रुपयांची कपात करण्यात आली असून ती १७६२ रुपयांवर आली आहे. तर कोलकात्यात ४४ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली असून येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १८६८.५० रुपयांवर आली आहे.

देशाच्या आर्थिक राजधानिचा अर्थात मुंबईचा विचार करता, येथे व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ४२ रुपयांनी कमी होऊन आता १७१३ रुपये ५० पैसे झाली आहे. जर चेन्नईमध्ये ४३.५० रुपयांच्या कपातीनंतर, सिलिंडरची नवीन किंमत १९२१.५० रुपये झाली आहे.

दुसऱ्या बाजूला घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीसंदर्भात बोलायचे झाल्यास, सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, मुंबईत 802 रुपये 50 पैसे, कोलकात्यात 829 रुपये तर चेन्नईमध्ये 818 रुपये 50 पैसे एवढी आहे. गेल्या 9 मार्च 2024 रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती.

महत्वाचे म्हणजे, दर महिन्याच्या सुरुवातीला सरकारी तेल कंपन्यांकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेऊन त्यांच्या किमतींवर निर्णय घेतला जातो. दरम्यान, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा, तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतीत व्यवसायिकांना धक्का दिला आहे.

गेल्या महिन्यात, १ मार्च रोजी, तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली होती.