वयाच्या ६९व्या वर्षी बिल गेट्स यांच्याकडून प्रेमाची जाहीर कबुली! कोण आहेत पॉला हर्ड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:55 IST2025-02-05T10:48:04+5:302025-02-05T10:55:07+5:30
Bill Gates Girlfriend : अब्जाधीश बिल गेट्स यांनी ६९ व्या वर्षी पॉला हर्डसोबत नात्यात असल्याची जाहीर कबुली दिली आहे. पॉला ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांची बायको आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची नवीन गर्लफ्रेंड पॉला हर्डसोबत असलेल्या नात्याची कुबीली दिली आहे. एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना गेट्स म्हणाले, सध्या आमचं मस्त चाललंय. ऐकमेकांना वेळ देतोय, ऑलिम्पिकचे सामने पाहतो आणि बऱ्याच छान गोष्टी करत आहे.
२०२३ पासून बिल गेट्स पॉला हर्डचे प्रेमसंबंध असल्याची कुजबूज सुरू होती. ते दोघे अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत. बिल गेट्स यांनी २०२१ मध्ये मलिंडा गेट्सपासून घटस्फोट घेतला. अवघ्या २ वर्षांनंतर ते पॉलासोबत रिलेशनशिपमध्ये आले.
पॉला हर्ड या ओरॅकलचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हर्ड यांचे २०१९ मध्ये कर्करोगाने निधन झाले. पॉलाला मार्कपासून कॅथरीन आणि केली या २ मुली आहेत. पॉलाच्या पतीने तिच्यासाठी सुमारे ५० कोटी डॉलर किमतीची मालमत्ता मागे सोडली.
पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी मिळवली आहे. पॉला हर्ड नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या कंपनीत काम करत होती. पॉलाने शैक्षणिक आणि सेवाभावी संस्थांनाही भरपूर देणगी दिली आहे.
२०१५ मध्ये एका टेनिस सामन्यादरम्यान बिल गेट्स आणि पॉला यांची भेट झाली होती. दोघांनाही टेनिसची भारी आवड आहे. दोघांचे अनेक कॉमन मित्र आहेत. यानिमित्ताने ते वारंवार भेटत राहिले. पॉलाच्या पतीच्या मृत्यूनंतर आणि बिल गेट्सच्या घटस्फोटानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता बिल गेट्स यांनी हे नाते जगजाहीर केलं आहे.
गेट्स पॉलासोबत नात्यात असले तरी पूर्वाश्रमीची पत्नी मेलिंडासोबत लग्न तुटल्याचा पश्चाताप होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. घटस्फोटाचा अनुभव चांगला नव्हता. आम्हाला ३ मुलं असून आम्ही एकत्र खूप चांगलं काम केलं आहे. पुढे ते म्हणाले, की आता मी बराच पुढे आलो आहे. मेलिंडानेही सत्य स्वीकारलं आहे. सध्या माझ्याकडे करण्यासारखं खूप असून माझ्या मनात कोणतीच तक्रार नाही.
बिल गेट्स यांचे नाव कंपनीतील महिला सहकाऱ्यासोबतही जोडले गेले होते. २०१९ मध्ये कथित महिलेने गेट्स सोबत असलेल्या नात्याचा खुलासा केला होता. पत्नी मेलिंडानेही गेट्सचे अफेअर असल्याची माहिती असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. कदाचित यावरुनच ते दोघे वेगळे झाले असावेत, असा अंदाज बांधला जात आहे.