जगभरातील अब्जाधीशांपैकी अदानींना सर्वाधिक नुकसान; पाहा आता किती आहे संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:02 PM2021-07-21T16:02:59+5:302021-07-21T16:07:25+5:30

Gautam Adani : जगभराती अब्जाधीशांपैकी अदानींना सर्वाधिक झालं नुकसान.

अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांना आणखी एक मोठा झटका लागला आहे. गौतम अदानी यांना संपत्तीच्या बाबतीत जगभरातील अन्य अब्जाधिशांच्या तुलनेत अधिक नुकसान झालं आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे नुकसान केवळ एका दिवसातलं आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची संपत्ती १.३१ बिलियन डॉलर्सनं कमी झाली आहे. त्यांच्याकडे आता ५१.४ बिलियन डॉलर्सची संपत्ती आहे.

ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सवर जगभरातील अब्जाधीशांचं रँकिंग प्रत्येक दिवसाच्या अखेरिस अपडेट केलं जातं. वेबसाईटवरील अखेरच्या अपडेटनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

गौतम अदानी यांच्यानंतर चीनच्या हुई का यान यांच्या संपत्तीत १.१३ बिलियन डॉलर्सची घसरण झाली. सध्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी हे २५ व्या स्थानावर आहेत.

तर दुसरीकडे आशियातील अब्जाधीशांच्या यादीत अदानी चौथ्या क्रमांकावर आहेत. काही दिवसांपूर्वी अदानींच्या संपत्ती वाढ होऊन ती ७० बिलियन डॉलर्स पेक्षाही अधिक झाली होती. त्यानंतर ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

सध्या अदानी समुहाच्या काही कंपन्यांचा सेबी आणि डीआरआयकडून नियमांच्या उल्लंघन प्रकरणी तपास सुरू आहे. परंतु कोणत्या कंपन्यांचा तपास केला जात आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अदानी समुहाच्या सहा कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. तसंच या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली आहे.

मंगळवारी तीन कंपन्या अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅल या कंपन्यांच्या शेअर्सच्या विक्रीमुळे लोअर सर्किट लावण्यात आलं होतं. तर अन्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांची घसरण झाली होती.

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये ९.३० टक्के, अदानी एन्टरप्राईजेसच्या शेअर्समध्ये १.०५ टक्के तर अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये ०.१६ टक्क्यांची घसरण झाली होती.

तर दुसरीकडे अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लोअर सर्किटही लावण्यात आलं होतं.