60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 02:20 PM 2024-10-22T14:20:29+5:30 2024-10-22T14:30:06+5:30
अमित शाह राजकारणाबरोबरच, शेअर बाजारातीलही 'धुरंधर' आहेत. ते कोट्यवधींचे मालक असून त्यांनी एकूण संपत्तीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवला आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा आज वाढदिवस. आज ते 60 वर्षांचे झाले आहेत. अमित शहा गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. अमित शहा यांना राजकारणातील चाणक्य म्हणूनही संबोधले जाते.
अमित शाह राजकारणाबरोबरच, शेअर बाजारातीलही 'धुरंधर' आहेत. ते कोट्यवधींचे मालक असून त्यांनी एकूण संपत्तीचा मोठा भाग शेअर बाजारात गुंतवला आहे. त्यांची अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.
किती आहे संपत्ती? - याच वर्षांत झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शहा यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहितीही दिली होती. प्रतिज्ञापत्रानुसार, अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांच्याकडे एकूण 65.67 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
एकट्या अमित शाह यांच्या संपत्तीचा विचार करता, ती 36 कोटी रुपयांहूनही अधिक आहे. त्याच्याकडे 20.23 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर 16 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रात रोख रक्कम, बँकेतील बचत, ठेवी, सोने, चांदी आणि वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे. त्याच्याकडे स्वतःचे असे कोणतेही वाहन नाही.
शेअर बाजारात मोठी गुंतवणूक - अमित शाह यांनी शेअर बाजारातही मोठी गुंतवणूक केली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार अमित शाह यांच्याकडे 17 कोटी रुपयांपेक्षाही अधिक किमतीचे शेअर्स आहेत. त्यांनी 179 लिस्टेड तर 79 अनलिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. यात, हिंदुस्तान युनिलिव्हर, एमआरएफ, कोलगेट-पामोलिव्ह आदी दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
या कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक - अमित शहा यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र, सर्वाधिक गुंतवणूक केलीय ती हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये. या कंपनीत त्यांनी सुमारे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीचा शेअर सध्या जवळपास 2703 रुपयांवर आहे. याशिवाय त्यांनी ITC, Infosys, Nerolac Paints आदी कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)