भाजपच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानं शेअर बाजारात छप्परफाड तेजी, 6 लाख कोटींनी वाढली गुंतवणूकदारांची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:04 PM2023-12-04T17:04:58+5:302023-12-04T17:15:14+5:30

आज सेन्सेक्सने 1400 अंकांच्या आणि निफ्टीने 430 अंकांच्या उसळीसह नव ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या नेत्रदीपक विजयाचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. सोमवारी अर्थात 4 डिसेंबरला भारतीय शेअर बाजार विक्रमी वाढीसह बंद झाला. आज सेन्सेक्सने 1400 अंकांच्या आणि निफ्टीने 430 अंकांच्या उसळीसह नव ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.

आजच्या सत्रात बँकिंगसोबतच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्येही जबरदस्त तेजी दिसून आली आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत या एकाच सत्रात 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

आजचा व्यवहार बंद झाला तेव्हा, बीएसई सेंसेक्स 1384 अंकांच्या उसळीसह 68,865 अंक, तर नॅशनल स्टॉक एक्सचेन्जचा निफ्टी 419 अंकांच्य उसळीसह 20,686 अंकांवर बंद झाला आहे.

अशी आहे सेक्टरची परिस्थिती - निफ्टी ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे. तर बँक निफ्टीही 1668 अंकांच्या उसळीसह 46,484 अंकांवर पोहोचली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल इंडेक्स देखील आपल्या लाइफटाइम उच्चांकावर जाऊन बंद झाला आहे.

आजच्या ट्रेंडमध्ये सरकारी आणि निमसरकारी दोन्ही बँकांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. सरकारी कंपन्यांमध्येही मोठी खरेदी दिसून आली आहे. सेंसेक्सच्या 30 शेअर्सपैकी 25 तेजी सह आणि 5 घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 पैकी 45 शेअर तेजीसह आणि 5 घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर - शेअर बाजारातील जबरदस्त तेजीमुळे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले आहे. आजच्या ट्रेडमध्ये हे मार्केट कॅप 343.45 लाख कोटी रुपये एवढे होते. तर गेल्या सत्रात मार्केट कॅप 337.53 लाख कोटी रुपये एवढे होते. अर्थात आजच्या ट्रेडमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत जवळपास 6 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)