Paytm ला आणखी एक धक्का! शेअर पडझडीची BSE ने घेतली दखल; दिले महत्त्वाचे निर्देश By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 04:25 PM 2022-03-23T16:25:00+5:30 2022-03-23T16:29:58+5:30
पेटीएममुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात असून, शेअरमध्ये घसरण सुरू आहे. आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून ते इंधनदरवाढ, महागाईचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे.
यातच उत्सुकता आणि बहुचर्चित कंपन्यांचे IPO सुपरफ्लॉप झालेल्यांमध्ये एक नाव आघाडीवर आहे ते Paytm कंपनीचे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेट झाल्यापासून पेटीएम कंपनीचे शेअर सातत्याने घसरतानाच दिसत आहेत. याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसत आहे.
भांडवली बाजारातील पदार्पणापासून गुंतवणूकदारांना होरपळून काढणाऱ्या पेटीएमच्या शेअरची अखेर शेअर बाजाराने (बीएसई) दखल घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराने पेटीएम कंपनी व्यवस्थापनाला शेअरमधील घसरणीचे कारण स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
Paytm ने शेअर बाजाराच्या निर्देशांना तत्काळ प्रतिसाद दिला आहे. पेटीएमच्या 'वन ९७ कम्युनिकेशन'च्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आयपीओवेळी 'वन ९७ कम्युनिकेशन'ची प्रती शेअर २१५० रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती.
Paytm चा शेअर पदार्पणाच्या दिवशी तब्बल १९ टक्के गडगडला होता. या घसरणीतून तो अद्याप सावलेला नाही. चार महिन्यात या शेअरचे मूल्य ७४.७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. या घसरणीची गंभीर दखल मुंबई शेअर बाजाराने घेतली आहे.
Paytm कंपनीला २२ मार्च २०२२ रोजी बीएसईने पत्र पाठवले असून त्यात घसरणीची कारणे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रावर तत्काळ पेटीएमकडून प्रतिसाद देण्यात आला आहे.
Paytm कंपनीची पाळेमुळे भक्कम आहेत. कंपनी भविष्यात वृद्धीच्या अपेक्षा व्यक्त करते असा दावा पेटीएमने केला आहे. कंपनी शेअरबाबत वेळोवेळी शेअर बाजाराला माहिती देईल, अशी ग्वाही पेटीएमने दिली आहे.
नुकताच रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती. पेटीएम पेमेंट बँकेचा आयटी लेखा परीक्षण अहवाल तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यासाठी आयटी ऑडिट कंपनीची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले होते.
नोव्हेंबर महिन्यात पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्सने शेअर बाजारात आयपीओ आणला होता. कंपनीने समभाग विक्रीतून १८३०० कोटींचे भांडवस उभारले होते. आयपीओसाठी प्रती शेअर २१३० रुपये भाव ठेवण्यात आला होता.
मात्र प्रत्यक्षात शेअर नोंदणीवेळी तो १९ टक्के गडगडला. त्यानंतर मागील चार महिन्यात त्यात प्रचंड घसरण झाली आहे. पेटीएमचे आयपीओवेळी १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल होते ते आता ४४००० कोटी इतके खाली आले आहे.