Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार?

By मोरेश्वर येरम | Published: January 20, 2021 09:21 PM2021-01-20T21:21:31+5:302021-01-22T14:08:51+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पात नेमकं कोणकोणत्या वस्तूंवरील किंमतीत वाढ होऊ शकते? जाणून घेऊयात...

यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर वस्तूंसह एकूण ५० गोष्टींवरील आयात शुल्कात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

आयात शुल्कात वाढ करून स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देत भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीला चालना देण्याचा केंद्राचा मानस आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी 'आत्मनिर्भर भारत' या योजनेला डोळ्यासमोर ठेवून आयात शुल्क वाढविलं जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

आयात शुल्कात वाढ करुन २०० ते २१० अब्ज रुपयांचा अतिरिक्त महसूल केंद्राला अपेक्षित आहे.

कोरोना संकटामुळे देशाच्या तिजोरीला आलेली मरगळ मोडून काढण्यासाठी केंद्राकडून या शुल्कवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, आयात शुल्कातील वाढीमुळे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वाहनांसोबतच फ्रीज आणि एसीच्या किंमतीतही वाढ होऊ शकते.

टेस्ला आणि आयकिया या परदेशी कंपन्यांनी याआधीच भारताच्या आयात शुल्काबाबत चिंता व्यक्त केली होती.

गेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून काही वस्तूंच्या आयात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे यावेळी नेमकी किती वाढ केली जातेय हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

गेल्या वर्षी केंद्राने फुटवेअर, फर्निचर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर अनेक गोष्टींवर २० टक्क्यांपर्यंत आयात शुल्कात वाढ केली होती.