Budget 2022 E-passport: बदलणार परदेशवारीची पद्धत, पाहा अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेलं ई-पासपोर्ट आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 03:03 PM2022-02-01T15:03:14+5:302022-02-01T15:06:17+5:30

Budget 2022 E-passport: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात E-Passport ची घोषणा केली. यासंदर्भात पहिल्यापासूनच अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी ई-पासपोर्टबाबत (E-Passport) मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट जारी केले जातील.

ई पासपोर्टमुळे नागरिकांना परदेशात जाण्याची सोय होणार आहे. अर्थसंकल्पापूर्वी सरकार ई-पासपोर्टबाबत मोठी घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती.

अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ई-पासपोर्टमध्ये चिप बसवली जाईल आणि हे तंत्रज्ञान 2022-23 मध्ये आणलं जाईल. त्यामुळे नागरिकांना परदेशात जाणे सोपे होणार आहे. ही चिप डेटाशी संबंधित सुरक्षा सुधारण्यासाठी वापरली जाईल.

मंत्रालय नागरिकांसाठी चिप ई-पासपोर्ट आणण्याबाबत चर्चा करत असल्याची माहिती यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली होती.

ई-पासपोर्ट सामान्यतः तुमच्या नियमित पासपोर्टची डिजिटल आवृत्ती असेल. यात इलेक्ट्रॉनिक चिप असेल, जी डेटा सुरक्षिततेसाठी मदत करेल. या मायक्रोचिपमध्ये पासपोर्टधारकाचे नाव आणि डे ऑफ बर्थसह इतर माहिती असेल.

हा पासपोर्ट दिल्यानंतर इमिग्रेशनसाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगेतून नागरिकांची सुटका होणार आहे. त्यातील चिपच्या मदतीने पासपोर्ट इमिग्रेशन काउंटरवर सहजपणे स्कॅन केला जाईल.

ई-पासपोर्टचा ट्रेंड अनेक देशांमध्ये आहे. अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी यांसारख्या देशांमध्ये याचा वापर पहिल्यापासूनच केला जातो. या देशांमध्ये बायोमेट्रिक ई-पासपोर्ट प्रणाली आहे. या पासपोर्टमध्ये 64KB स्टोरेज स्पेस आहे, ज्यामध्ये वापरकर्ता तपशील संग्रहित केला जातो.