सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! घर बांधण्यासाठी मिळू शकतात जादा पैसे आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:29 PM2023-01-23T13:29:13+5:302023-01-23T13:45:29+5:30

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांना दोन भेटवस्तू मिळू शकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या पगाराचा फिटमेंट फॅक्टर बदलण्याची घोषणा करू शकतात.

यासोबतच कर्मचाऱ्यांना हाऊस बिल्डिंग अलाउंस अॅडव्हान्स देखील 25 लाख रुपयांवरून 30 लाख रुपयांपर्यंत वाढवू शकतात. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा हेऊ शकतात.

एका अहवालानुसार, सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन सुधारणांबाबत दीर्घकाळ चर्चा सुरू आहे. पुढील वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरद्वारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होऊ शकते.

सरकारी कर्मचार्‍यांचे पगार दर 10 वर्षांऐवजी दरवर्षी वाढले पाहिजे, असे सरकारचे मत आहे. त्यामुळे खालच्या पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना वरच्या पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांइतकाच पगार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी वाढ करण्याची कल्पना माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांची आहे. 2016 मध्ये 7 व्या वेतन आयोगाला मंजुरी देताना जेटली म्हणाले होते की, कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी वाढ करण्याची वेळ आली आहे. याचा फायदा कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना होणार आहे.

अहवालानुसार,8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला एक वर्ष बाकी आहे. अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांच्या वेतन सुधारणेसाठी सरकार बजेटमध्ये नवीन फॉर्म्युला आणू शकते. दरवर्षी पगारवाढीची व्यवस्था पुढील अर्थसंकल्पापासूनच लागू होऊ शकते.

2023 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी घर बांधणी भत्ता संदर्भात दोन मोठ्या घोषणा होऊ शकतात. सरकार भत्त्याची आगाऊ रक्कम आणि त्यावर आकारले जाणारे व्याज दोन्ही वाढवू शकते. सध्या केंद्रीय कर्मचारी घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी 25 लाख रुपयांपर्यंत एचआर अॅडव्हान्स म्हणून सरकारकडून घेऊ शकतात.

सध्या घरबांधणी भत्त्यावरील व्याजदर 7.1 टक्के आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात, निर्मला सीतारामन HBA चा व्याज दर 7.5 टक्क्यांपर्यंत सुधारित करू शकतात आणि आगाऊ मर्यादा सध्याच्या 25 लाख रुपयांवरून 30 लाखांपर्यंत वाढवू शकतात.