बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 06:59 PM2024-10-08T18:59:57+5:302024-10-08T19:13:05+5:30

Bullet Train Station : बुलेट ट्रेन जितकी खास म्हटली जात आहे. तितकेच बुलेट ट्रेनचे स्टेशनही खास बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली : देशातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सरकारही यावर वेगानं काम करत आहे. दरम्यान, बुलेट ट्रेनशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

बुलेट ट्रेन जितकी खास म्हटली जात आहे. तितकेच बुलेट ट्रेनचे स्टेशनही खास बनवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पात एकूण १२ स्टेशन तयार करण्यात येणार आहेत.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (NHSRCL) म्हटलं आहे की, या मार्गावर तयार करण्यात सर्व १२ रेल्वे स्टेशनवर एनर्जी सेव्हर एस्केलेटर बसवले जाणार आहेत. अशा प्रकारचा एस्केलेटर देशात पहिल्यांदाच वापरले जात आहे. यामुळे प्रवाशांची सोय होण्यासोबतच ९० टक्के विजेची बचत होण्यासही मदत होणार आहे.

तसंच, अशा एस्केलेटरचा पहिला सेट आनंद स्टेशनवर बसवला जात आहे. या आधुनिक एस्केलेटरमुळं बुलेट ट्रेनच्या स्टेशनला केवळ एक खास लुक मिळणार नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही ते अधिक चांगले होईल, असंही नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं म्हटलं आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं म्हटलं आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत ते अतुलनीय आहे. या एस्केलेटरमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे, जी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देते. पायाभूत सुविधांच्या मानकांच्या क्षेत्रात हे एक मोठे अपडेट आहे आणि असे एस्केलेटर बसवून स्टेशनवर होणारे अपघात पूर्णपणे रोखले जाऊ शकतात.

हे आधुनिक एस्केलेटर गुजरातमधील आनंदमध्ये पहिल्यांदाच बसवले जात आहे. यामध्ये अनेक मॉडर्न सेफ्टी फीचर्स बसवण्यात आली आहेत, जसे की ऑटोमॅटिक हॉल्ट सिस्टीम जी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपोआप एस्केलेटर थांबवते. याशिवाय इमर्जन्सी स्टॉप बटणही बसवण्यात आले आहेत. सुरक्षेसोबतच प्रवाशांचा प्रवास अनुभव सुलभ करण्यात ही सिस्टम मोठी भूमिका बजावेल.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचं म्हणणं आहे की, बुलेट ट्रेन स्टेशनवर हे हाय-टेक एस्केलेटर बसवण्याचा उद्देश ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच प्रवाशांना सुरक्षित वाटणे हा आहे. बुलेट ट्रेनमुळं केवळ हायस्पीड प्रवासच होणार नाही तर प्रवाशांना आराम आणि सुरक्षितताही मिळेल. हे एस्केलेटर देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मैलाचा दगड ठरेल.