सरकारच्या मदतीने सुरू करा 'हा' व्यवसाय; 6 लाखांचा होईल निव्वळ नफा, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 05:56 PM2022-02-19T17:56:38+5:302022-02-19T18:20:11+5:30

Business Idea : साबण उत्पादन युनिटमध्ये तुम्हाला सरकारकडून मदत तर मिळेलच पण नफाही प्रचंड होईल.

नवी दिल्ली : तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम बिझनेस आयडिया (New Business idea) घेऊन आलो आहोत. हा असा व्यवसाय आहे, ज्याची मागणी प्रत्येक वर्गात कायम आहे.

हा व्यवसाय साबण निर्मितीचा (soap manufacturing) आहे. तुम्हाला साबण बनवण्याच्या व्यवसायात जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही. यासोबतच सरकारही तुम्हाला यामध्ये मदत करेल.

साबण उत्पादन युनिटमध्ये तुम्हाला सरकारकडून मदत तर मिळेलच पण नफाही प्रचंड होईल. या व्यवसायात मशिनच्या साहाय्याने साबण बनवला जातो. साबण बनवल्यानंतर त्याची विक्री करण्यासाठी बाजारात नेला जातो. दरम्यान, बरेच लोक हाताने साबण बनवतात आणि बाजारात विकतात.

विशेष म्हणजे हा व्यवसाय अगदी लहान प्रमाणातही सुरू करता येतो. साबणाला मागणीमुळे हा व्यवसाय प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होतो. भारतात साबण बाजाराच्या अनेक श्रेणी आहेत. साबण बाजार त्याच्या वापराच्या आधारावर विविध श्रेणींमध्ये विभागला जाऊ शकतो.

जसे की, लाँड्री साबण (Laundry Soap), ब्युटी साबण (Beauty Soap), मेडिकेटेड साबण (Medicated Soap), किचन साबण (Kitchen Soap), सुगंधी साबण (Perfumed Soap) इत्यादी आहेत. मागणी आणि बाजारपेठ लक्षात घेऊन तुम्ही यापैकी कोणतीही श्रेणी निवडू शकता.

साबण बनवण्याचे युनिट सेट करण्यासाठी, तुम्हाला एकूण 750 चौरस फूट जागेची आवश्यकता लागेल. त्यासाठी 500 चौरस फूट आच्छादित आणि उर्वरित खुली जागा आवश्यक आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या मशिन्ससह 8 प्रकारची उपकरणे लागतील.

प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, या मशिन्स बसवण्यासाठी एकूण एक लाख रुपये खर्च येईल. साबण बनवण्याचे एक उत्पादन युनिट उभारण्यासाठी तुम्हाला एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. पण हा व्यवसाय सोपा आहे कारण त्यात युनिटची जागा, यंत्रसामग्री, तीन महिन्यांचे खेळते भांडवल यांचा समावेश आहे.

या 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला फक्त 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. उर्वरित रक्कम तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज म्हणून घेऊ शकता. केंद्र सरकारच्या मुद्रा योजना प्रोजेक्ट प्रोफाइलनुसार, तुम्ही 1 वर्षात एकूण सुमारे 4 लाख किलो उत्पादन करू शकाल. त्याची एकूण किंमत 47 लाख रुपये असेल.

या योजनेंतर्गत, तुम्हाला सर्व खर्च आणि इतर दायित्वे यानंतर 6 लाख रुपये म्हणजेच 50,000 रुपये दरमहा निव्वळ नफा मिळेल. साबण व्यवसायाच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची मागणी लहान शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत आणि गावांमध्ये आहे.

अशा परिस्थितीत साबण बनवण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी कमी पैशात साबण कारखाना उघडू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 80 टक्के कर्ज घेता येईल.