12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 02:39 PM2023-11-26T14:39:39+5:302023-11-26T14:43:10+5:30

आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट-गाड्या-दागिने दिले दिल्या अन् मुलाने बेकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम केले.

Success Story: जगातील कुठलाही बाप, आपल्या मुलांनी आरामदायी जीवन जगावे, यासाठीच प्रयत्न करत असतो. जगभरात अनेक श्रीमंत लोक आहेत, ज्यांनी आपल्या मुलांसाठी मोठा व्यवसाय आणि पैसा जमवून ठेवला आहे. पण, असे काही लोकही आहेत, ज्यांनी आपल्या मुलांना परिस्थितीची जाण करुन देण्यासाठी, व्यवसाय सोपवण्यापूर्वी परिश्रम घ्यायला भाग पाडतात. अशा व्यक्तींमध्ये गुजरातच्या प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्याचेही नाव आहे.

आम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहोत, सूरतेतील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी धनजी ढोलकिया आहेत. त्यांना सूरतील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले जाते. ते देशातील आघाडीचे हिरे व्यापारीदेखील आहेत. हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक-अध्यक्ष सावजी धनजी ढोलकिया उदार उद्योजक म्हणूनही ओळखले जातात. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि फ्लॅटसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. विशेष म्हणजे, आपल्या मेहनतीने अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभारणाऱ्या या व्यक्तीने आपल्या मुलाला सुरुवातीच्या काळात साधारण नोकरी करायला भाग पाडले होते.

1992 मध्ये सावजी धनजी यांनी त्यांच्या 3 भावांसह सूरतमध्ये हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. तेव्हापासून कंपनीचा विस्तार सुरूच आहे. 6500 कर्मचार्‍यांसह कंपनी हिरे व्यवसायात अग्रगण्य नाव बनले आहे. अफाट संपत्ती आणि प्रसिद्धी मिळूनही सावजी धनजी ढोलकिया हे अतिशय नम्र आणि उदार व्यक्ती आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेणाऱ्या सावजींनी आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीही कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले.

मुलाने बेकरीत काम केले-सावजी धनजींनी आपला मुलगा द्रव्याला कुटुंबाचे नाव आणि ओळख न वापरता स्वतंत्रपणे काम करण्यास प्रोत्साहित केले. वडिलांच्या सल्ल्यानुसार, द्रव्याने चपलांचे दुकान, मॅकडोनाल्ड आणि कॉल सेंटरसह विविध ठिकाणी नोकऱ्या केल्या. आर्थिक संघर्षाचा सामना करत द्रव्याने आयुष्यातील सर्वात मौल्यवान धडे शिकले. वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असूनही द्रव्याने एका बेकरीमध्ये दिवसाला 200 रुपये पगारावर काम केले.

दिवळी बोनसची नेहमी चर्चा-सावजी धनजी धोलकियांनी आपल्या मुलाला कठोर परिश्रम करण्यास सांगितले. मात्र, ते आपल्या कर्मचार्‍यांसाठी नेहमीच उदार राहिले आहेत. कर्मचार्‍यांना देत असलेल्या दिवाळी बोनससाठी ते नेहमीच चर्चेत येतात. बोनस म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना दागिने, कार आणि फ्लॅट यांसारख्या भव्य भेटवस्तू दिल्या आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये त्यांनी पात्र कर्मचाऱ्यांना 600 कार भेट दिल्या होत्या.

12 हजार कोटींची संपत्ती-त्यापूर्वी 2016 मध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1,260 कार भेट दिल्या होत्या. अशा उदार बोनसमागील कारण विचारले असता, ते म्हणाले की प्रत्येकाचे स्वतःचे घर आणि कार असण्याचे स्वप्न असते, म्हणूनट मी माझ्या कर्मचाऱ्यांना हे स्वप्न साकार करण्यास मदत करतो. डीएनए रिपोर्टनुसार सावजी धनजी ढोलकिया यांची एकूण संपत्ती 12,000 कोटी रुपये आहे.