Byjus Crisis: बायजू रवींद्रन यांना मोठा झटका; शेअरहोल्डर्सनं बोर्डातून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 08:41 AM 2024-02-24T08:41:46+5:30 2024-02-24T08:54:56+5:30
कंपनीच्या भागधारकांनी शुक्रवारी बायजू रवींद्रन यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला. एडटेक कंपनी बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना मोठा झटका बसला आहे. कंपनीच्या भागधारकांनी शुक्रवारी बायजू रवींद्रन यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला. कंपनीच्या EGM मध्ये (असाधारण सर्वसाधारण सभा) भागधारकांनी एकमतानं कंपनीचे संस्थापक सीईओ बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांना हटवण्याच्या बाजूनं मतदान केलं.
मात्र दुसरीकडे बायजू रवींद्रन यांच्या कुटुंबीयांनी हे मतदान बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंपनी चुकीच्या पद्धतीनं चालवल्याचा ठपका ठेवत बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीच्या ईजीएममध्ये हा निर्णय घेण्यात आला. बायजू रवींद्रन आणि त्यांचे कुटुंबीय या ईजीएमला उपस्थित नव्हते. त्यांनी ही ईजीएम बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय.
याआधी शुक्रवारी कंपनीच्या चार गुंतवणूकदारांचा एक गटही NCLT मध्ये पोहोचला. त्यांनी एनसीएलटीच्या बेंगळुरू खंडपीठात याचिका दाखल केली. यामध्ये व्यवस्थापन कंपनी चालवण्यास योग्य नसल्याचं म्हटलं आहे. कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना सीईओ पदावरून हटवण्याची मागणी गुंतवणूकदार करत आहेत.
रवींद्रन, त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ आणि भाऊ रिजू रवींद्रन हे बायजूच्या मूळ कंपनी थिंक अँड लर्नच्या बोर्डाचे सदस्य आहेत. डच गुंतवणूक कंपनी प्रोससच्या नेतृत्वाखालील चार गुंतवणूकदारांनी एनसीएलटीमध्ये याचिका दाखल केली आहे. कंपनीला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही, असं यासंदर्भात बायजूसच्या प्रवक्त्यानं सांगितलं.
रिपोर्ट्सनुसार, ज्या भागधारकांनी EGM बोलावली होती त्यांची बायजूसमध्ये एकूण ३० टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी आहे. रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबाकडे कंपनीत जवळपास २६ टक्के हिस्सा आहे. बायजू कंपनीवरही मनी लाँड्रिंगचा आरोपही करण्यात आलाय, त्याची सक्तवसूली संचालनालयाकडून चौकशी केली जात आहे.
बायजूस यांच्यावर ९००० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत ईडीनं कंपनीचे सीईओ म्हणून रवींद्रन यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. तसंच त्यांना देशाबाहेर जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.