PM Kisan Maandhan Yojana : आता शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन; काय आहे योजना? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 03:13 PM2022-09-15T15:13:20+5:302022-09-15T15:21:06+5:30

PM Kisan Maandhan Yojana : वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. पीएम किसान मानधन योजना ही देखील अशीच एक योजना आहे. वृद्ध शेतकऱ्यांसाठी ही पेन्शन योजना आहे. वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून वाचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

या योजनेंतर्गत 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे. यामुळे वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल, कारण वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांना शेतीची कामे करता येत नाहीत.

देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन देण्यासाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3000 रुपयांच्या हिशोबाने 36,000 रुपये वार्षिक पेन्शन दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी यासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतर, शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार प्रीमियम म्हणून दरमहा काही पैसे द्यावे लागतील. शेतकऱ्यांच्या वयानुसार ही रक्कम निश्चित केली जाते. यामध्ये शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतात.

पीएम किसान मानधन योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला तुमचे वार्षिक उत्पन्न आणि तुमच्या जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. यासोबतच तुम्हाला ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत, त्या बँक खात्याची माहिती द्यावी लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला एक अर्ज मिळेल, जो तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड दिले जाईल.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. यासाठी तुम्हाला या योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाइट maandhan.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर तुम्हाला या योजनेचा फॉर्म भरावा लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला पेन्शन क्रमांक आणि पेन्शन कार्ड मिळेल.

या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही 1800-267 6888 या टोल फ्री नंबरवर सुद्धा संपर्क साधू शकता.