रस्त्यावर भजे तर स्टेशनवर साड्या विकल्या; आज आहेत कोट्यवधीच्या व्यवसायाचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 03:59 PM2023-06-13T15:59:50+5:302023-06-13T16:04:36+5:30

कधीकाळी भजे विकणारे चांद बिहारी कोण आहेत? जाणून घ्या त्यांची संघर्षगाथा...

नवी दिल्ली : शून्यातून मोठं विश्व निर्माण करण्याची कला फार कमी लोक अवगत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत, ज्याची कथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. ही गोष्ट चांद बिहारींची आहे, जे एकेकाळी जयपूरच्या फूटपाथवर भजे विकायचे. नंतर पाटणा रेल्वे स्थानकावर 12-14 तास उभं राहून महिलांच्या साड्यादेखील विकल्या. आज चांद बिहारी अग्रवाल हे पाटण्यातील सर्वात मोठे दागिन्याचे व्यापारी आहेत.

एकेकाळी आई आणि भावासोबत जयपूरच्या फूटपाथवर भजे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे चांद बिहारी आता पाटण्यातील एक प्रसिद्ध ज्वेलर्स आहेत. त्यांची वार्षिक उलाढाल 20 कोटींहून अधिक आहे. अतिशय गरिबीत बालपण घालवणारे चांद बिहारी आज करोडोंच्या व्यवसायाचे मालक आहेत.

त्यांची गोष्ट जयपूरपासून सुरू होते. ते जयपूरमध्ये पाच भावंडांसोबत राहायचे. वडिलांना जुगाराचे व्यसन होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. मुलांना खायला घालण्यासाठी आईने जयपूरमध्ये फुटपाथवर भजे विकायला सुरुवात केली. चांद बिहारी आणि त्यांचा भाऊ रतन, हे आईला मदत करायचे.

घरची परिस्थिती अशी नव्हती की ते शाळेत जाऊ शकतील. 1966 मध्ये चांद बिहारी अवघ्या 10 वर्षांचे असताना आईसोबत भजे विकायचे. 1972 मध्ये त्यांचा मोठा भाऊ रतनचे बिहारमध्ये लग्न झाले. त्याला लग्नात भेट म्हणून 5000 रुपये मिळाले, ज्यातून त्यांनी जयपूरमध्ये 18 चांदौरी साड्या विकत घेतल्या आणि पाटण्याला नेल्या.

तिथे त्यांनी नमुना दाखवला, तो लोकांना तो खूप आवडला. यानंतर जयपूर ते पाटणा साड्या विकण्याचे काम त्यांनी सुरू केले. काम वाढू लागल्यावर त्यांनी भाऊ चांदलाही बोलावून घेतले. चांद पाटणा रेल्वे स्टेशनवर साड्या विकायचा. काही वर्षांनंतर त्यांनी पाटणा रेल्वे स्थानकाजवळ फूटपाथवर दुकान सुरू केले.

राजस्थानी साड्यांचे काम सुरू झाले. मिळालेल्या नफ्यातून त्यांनी 1977 मध्ये पाटण्यात दुकान उघडले. अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या दुकानावर दरोडा पडला आणि संपूर्ण व्यवसायच कोलमडला. तरीही त्यांनी हिंमत गमावली नाही. भावाच्या मदतीने त्यांनी दागिन्यांच्या व्यवसायात हात आजमावला. भावाने 5 हजार रुपये दिले आणि त्यांनी पाटण्यात जेम्स अँड ज्वेलरीचे दुकान उघडले. गुणवत्ता आणि विश्वासाच्या बळावर त्यांनी आपला व्यवसाय जमवला.

1988 मध्ये त्यांनी 10 लाखांची कमाई केली होती, तर 2016 मध्ये त्यांची उलाढाल सुमारे 17 कोटी होती. आज ते वर्षाला 20 कोटींहून अधिकचा व्यवसाय करत आहेत. बिहार-यूपीच्या दिग्गज ज्वेलर्समध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. पाटण्यासह आसपासच्या परिसरात त्यांचे खूप नाव आहे. सिंगापूर येथील ऑल इंडिया बिझनेस अँड कम्युनिटी फाऊंडेशननेही सन्मानित केले. चांद बिहारी यांचा व्यवसाय आता मुलगा पंकज पाहत आहे. चांद आपल्या संघर्षाचे दिवस विसरत नाहीत. करोडोंचे मालक असूनही त्यांनी आपले जीवन अत्यंत साधे ठेवले आहे.