उद्यापासून बदलणार 'हे' मोठे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम; पाहा काय आहेत बदल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 02:31 PM2023-01-31T14:31:44+5:302023-01-31T14:43:59+5:30

पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यावर बहुतेक लोकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. 2 महिन्यांनंतर आपण 2023-24 या आर्थिक वर्षात प्रवेश करणार आहोत. यानंतर लोक पुन्हा एकदा कर नियोजन आणि इतर आर्थिक निर्णयांबद्दल विचार करू लागतील. मात्र, त्याआधी म्हणजेच फेब्रुवारीमध्येही असे काही बदल होत आहेत, ज्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो.

यासोबतच, आरबीआयची MPC बैठक देखील होणार आहे, जिथे पॉलिसी रेटमधील बदलाचा परिणाम तुमच्या व्यक्तिगत पैशांवर देखील दिसून येईल. याबाबत आतापासूनच तयारी करायला हवी. पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यावर बहुतेक लोकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हे बदल काय आहेत ते पाहूया...

आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) च्या बैठकीत 8 फेब्रुवारीला निर्णय होणार आहे. यामध्ये, पॉलिसी रेटमध्ये 25-35 बेसिस पॉइंट्सची वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी एमपीसीने पॉलिसी रेटमध्ये 225 बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती. 100 बेसिस पॉइंट्स म्हणजे 1 टक्के. आणखी रेट वाढीनंतर कर्जे पुन्हा महाग होतील.

27 जानेवारीपासून स्टॉकमध्ये T+1 सेटलमेंट सायकल लागू करण्यात आली. म्हणजेच शेअर्सची खरेदी आणि विक्री आता दुसऱ्याच दिवशी तुमच्या डिमॅट खात्यात दिसून येईल. यासोबत जोडलेले म्युच्युअल फंड, जे आता T+3 रिडेम्प्शन सायकलचे अनुसरण करत होते, ते आता T+2 रिडेम्प्शन सायकलकडे जातील.

13 फेब्रुवारीपासून कॅनरा बँक (Canara Bank) आपल्या डेबिट कार्डच्या वापरावरील सेवा शुल्कात वाढ करणार आहे. क्लासिक डेबिट कार्डची वार्षिक फी 125 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढणार आहे. प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी 500 रुपये आणि बिझनेस डेबिट कार्डसाठी 300 रुपये असतील. कार्ड बदलण्याचे शुल्कही 50 रुपयांवरून 150 रुपये करण्यात आले आहे.

एचडीएफसी (HDFC) बँकेने आपल्या मिलेनिया डेबिट कार्डसाठी रिवॉर्ड रिडेम्प्शन निकष बदलले आहेत. हा बदल 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहक आता उत्पादनाच्या किमतीच्या 70 टक्के रिडीम करू शकतात आणि उर्वरित रक्कम क्रेडिट कार्डद्वारे भरावी लागेल. कॅशबॅकसाठी दर महिन्याला फक्त 3000 रिवॉर्ड पॉइंट रिडीम करू शकता.

दरम्यान, यंदाचे आर्थिक वर्ष सुरू व्हायला अजून 2 महिने आहेत, पण तुम्ही आतापासूनच कर नियोजनाला (टॅक्स प्लॅनिंग) सुरुवात करायला पाहिजे. कर वाचवण्यासाठी तुम्ही फेब्रुवारीपासूनच विविध योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता. उदाहरणार्थ, PPF, NPS, SSY, ELSS किंवा लाइफ इन्शुरन्स प्रीमियम इत्यादी.