RailTel नं ४००० रेल्वे स्थानकांवर सुरू केली प्रीपेड Wi-Fi सेवा; ७० रूपयांत मिळणार 'इतका' जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 03:38 PM2021-03-05T15:38:25+5:302021-03-05T15:48:32+5:30

Railway Station Prepaid Wi-fi Service: RailTel नं गुरूवारी आपली प्रीपेड व्हायफाय सेवा केली सुरू

सध्या प्रत्येकासाठीच इंटरनेट आणि मोबाईल या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या आहेत. आपलं प्रत्येकाचं काम या दोन गोष्टींच्या सहाय्यानं होत असतं.

सध्या रेलटेलनंही गुरूवारी देशातील काही रेल्वे स्थानकांवर आपली Wi-Fi सेवा सुरू केली आहे.

यासाठी देशातील ४ हजार रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.

या अंतर्गत ग्राहकांना ४ हजार रेल्वे स्थानकांवर पहिले पेसै भरून हायस्पीड इंटरनेट सेवा वापरता येणार आहे.

य़ापूर्वी रेलटेलकडून देशातील ५,९५० रेल्वे स्थानकांवर मोफत इंटरनेट सेवा पुरवली जात आहे. याचा वापर कोणताही स्मार्टफोन धारक करू शकते.

मोफत Wi-Fi सेवेसाठी प्रवाशाला आपल्या मोबाईल क्रमांकासह लॉग इन करावं लागतं.

नव्या प्रीपेड योजनेअंतर्गत युझर्सना रोज ३० मिनिटांसाठी १ एमबीपीएस स्पीडवर इंटरनेट वापरता येणार आहे.

यानंतर ३४ एमबीपीएस स्पीडसाठी युझर्सना फार कमी पैसे भरावे लागतील.

एका दिवसासाठी १० रूपयांत ५ जीबी डेटा, तसंच १० रूपयांमध्ये १० जीबी डेटाही घेता येऊ शकतो.

तर दुसरीकडे पाच दिवसांच्या वैधतेसह २० रूपयांमध्ये १० जीबी आणि ३० रूपयांमध्ये २० जीबी डेटाही वापरता येणार आहे.

याशिवाय अधिक वैधता असलेले प्लॅनही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १० दिवसांच्या वैधतेसह युझर्सना ४० रूपयांत २० जीबी आणि ५० रूपयांत ३० जीबी डेटा देण्यात येईल.

यानंतर महिन्याभराच्या वैधतेसह युझर्सना ७० रुपयांमध्ये ६० जीबी डेटा देण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशाच्या २० रेल्वे स्थानकांवर यो योजनेची चाचणी करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर मिळालेला प्रतिसाद पाहून ४ हजारांपेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी दिली.

सर्व रेल्वे स्थानकं रेलटेल Wi-Fi नं जोडण्याचीही आपली योजना असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोणताही युझर आपल्याला हव्या त्या प्रकारे प्लॅन निवडू शकतो असे हे प्लॅन तयार करण्यात आल्याचं चावला यांनी सांगितलं.

यासाठी लागणारे पैसे भरण्यासाठी नेटबँकिंग, ई वॉलेट किंवा क्रे़डिट कार्डाचाही वापर करता येणार आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईनही हे प्लॅन खरेदी करता येतील.

कोरोना महासाथीपूर्वी ३ कोटी लोकं या सेवाचा लाभ घेत असल्याचंही चावला यांनी सांगितलं.

कोरोनाची परिस्थिती अधिक सुधारल्यानंतर प्रीपेड Wi-Fi सेवेद्वारे वर्षाला १०-१५ कोटी रूपयांचा महसूल मिळू शकतो अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (रेलटेल) हा रेल्वे मंत्रालयांतर्गत एक मिनी रत्न (श्रेणी - I) केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.