आरबीआयच्या निर्णयानंतर एफडी व्याजदरात मोठे बदल; 'या' 6 बँका देतायेत सर्वाधिक परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 10:56 IST2025-02-23T10:49:24+5:302025-02-23T10:56:42+5:30
FD interest rate : आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर बँका एफडीवरील व्याज कमी करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही एफडी घेण्याचा विचार करत असाल तर उशीर करू नका.

गेल्या तीन महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आपल्या गुंतवणुकीत वैविध्य असणे फार आवश्यक आहे. तुम्ही जोखीम नसलेला आणि निश्चित परतावा देणारा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी बचत ठेव (एफडी योजना उत्तम आहे. सध्या अनेक बँका बचत ठेव योजनांवर चांगला परतवा देत आहेत. आज आपण अशाच ६ बँकांबद्दल माहिती घेणार आहोत.
सिटी युनियन बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. आता बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ५% ते ७.५०% वार्षिक व्याजदर देत आहे. बँक सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ५% ते ८% वार्षिक व्याजदर देते. बँक ३३३ दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याज दर देत आहे. या योजनेत सर्वसामान्य लोकांना ७.५०% वार्षिक दराने व्याज मिळू शकते. तर ज्येष्ठ नागरिकांना ३३३ दिवसांच्या कालावधीसाठी ८% वार्षिक दराने व्याज मिळत आहे.
डीसीबी बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. पण, हे एफडी व्याजदर केवळ निवडक कालावधीसाठी कमी करण्यात आले आहेत. डीसीबी बँक एफडी रकमेवर वार्षिक ३.७५% आणि ८.०५% दरम्यान व्याजदर ऑफर करते. १९ महिने ते २० महिन्यांच्या कालावधीसह एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक ८.०५% व्याजदर दिला जातो. याच कालावधीत, ज्येष्ठ नागरिक वार्षिक ८.५५% कमवू शकतात. सुधारित एफडी दर १४ फेब्रुवारी २०२५ पासून लागू आहेत.
कर्नाटक बँकेने देखील एफडी व्याजदर सुधारित केले आहेत. बँक सध्या सामान्य नागरिकांसाठी ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक ३.५०% आणि ७.५०% दरम्यान व्याजदर देते. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बँक त्याच कालावधीसाठी वार्षिक ३.७५% आणि ८% दरम्यान व्याजदर देते. बँक ४०१ दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक ७.५०% वार्षिक व्याज दर देत आहे.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँकेने मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात कपात केली आहे. तिच्या वेबसाइटनुसार, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आता एफडीवर सामान्य नागरिकांसाठी ३.५०% ते ८.५५% वार्षिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४% ते ९.०५% वार्षिक व्याजदर ऑफर करते. सामान्य लोक १२ महिने, १ दिवस आणि १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी वार्षिक ८.५५% या सर्वोच्च व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या बचत खात्यावरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. त्यांच्या वेबसाइटनुसार, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आता एफडीवर सामान्य नागरिकांसाठी ३.७५% ते ८.२५% वार्षिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.२५% ते ८.७५% वार्षिक व्याजदर ऑफर करते.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने ३ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी त्यांच्या मुदत ठेवी (FD) व्याजदरात सुधारणा केली आहे. सुधारित व्याजदर १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होतील. तिच्या वेबसाइटनुसार, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आता एफडीवर सामान्य नागरिकांसाठी ४% ते ८.६०% वार्षिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.५०% ते ९.१०% वार्षिक व्याजदर ऑफर करते. बँक दरवर्षी ८.६०% चा सर्वोच्च FD व्याज दर देत आहे.