चीनी 'DeepSeek' नं जगातील टॉप श्रीमंतांना केलं बर्बाद; २४ तासांत ९ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:33 IST2025-01-28T11:14:07+5:302025-01-28T11:33:57+5:30

चीनी AI डेव्हलपर डीपसीक(DeepSeek)नं २४ तासांत जगभरातील सर्वाधिक श्रीमंतांचं मोठं आर्थिक नुकसान केले आहे. डीपसीकमुळे सर्वात जास्त नुकसान अमेरिकन शेअर बाजाराचं झालं आहे.

चीनी AI डेव्हलपर डीपसीक(DeepSeek)नं २४ तासांत जगभरातील सर्वाधिक श्रीमंतांचं मोठं आर्थिक नुकसान केले आहे. डीपसीकमुळे अमेरिकेसह जगातील बहुतांश देशांच्या शेअर मार्केटवर परिणाम झाल्याचं दिसून आले. सर्वात जास्त नुकसान अमेरिकन शेअर बाजाराचं झालं आहे.

शेअर बाजार कोसळल्याने जगातील टॉप ५०० श्रीमंत लोकांच्या संपत्तीत एकूण १०८ अब्ज डॉलर म्हणजेच ९.३४ लाख कोटी घट झाली आहे. सोमवारी अमेरिकन मार्केट नास्डैक कंपोजिट इंडेक्समध्ये ३.१ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. ब्ल्यूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्समध्ये सर्वात जास्त नुकसान अशा उद्योगपतींचे झाले ज्यांचा व्यवसाय AI शी निगडीत होता.

यात ओरेकल कॉर्प(Oracle Corp) चे को-फाऊंडर लॅरी एलिसन आणि एनवीडिया कॉर्पचे को-फाऊंडर जेन्सन हुआंग यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. २४ तासांत हुआंग यांच्या संपत्तीत २०.१ अब्ज डॉलर म्हणजे २० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे त्यांची संपत्ती १०१ अब्ज डॉलर इतकी राहिली.

दुसरीकडे लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत १२ टक्के म्हणजे २२.६ अब्ज डॉलरचं नुकसान झालं. त्यांची एकूण संपत्ती १७१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. या घसरणीमुळे डेल इंक.चे मायकेल डेल यांना १३ अब्ज डॉलर्स आणि बायनन्स होल्डिंग्ज लिमिटेडचे ​​सह-संस्थापक चांगपेंग “सीझेड” झाओ यांना १२.१ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना ९४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

सोमवारी बाजारात मोठी घसरण झाली असूनही अनेक टेक कंपन्या टिकून राहिल्या. यामुळे त्यांच्या अब्जाधीश फाऊंडर किंवा को फाऊंडरची संपत्ती देखील वाढली. सोमवारी सुरुवातीच्या सत्रातील घसरणीतून मेटाने सावरल्यानंतर मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती ४.३ अब्ज डॉलर्सने वाढली.

त्याच वेळी, Amazon चे जेफ बेझोस यांच्या संपत्तीत सुमारे ६३२ मिलियन डॉलरने वाढ झाली. याशिवाय बिल गेट्सची एकूण संपत्तीही ४३८ मिलियन डॉलर्सने वाढली. डीपसीकने Apple स्टोअरवर ChatGPT सारख्या मोठ्या कंपनीला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. डीपसीक ही सामान्य AI कंपनी नाही. ही OpenAI आणि अन्य लोकप्रिय टूल्सला कडवं आव्हान देत आहे.

चायनीज कंपनी DeepSeek Lab ने R1 AI मॉडेल लॉन्च केले आहे, जे सध्या जगभरात खूप लोकप्रिय होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात ते ChatGPT, Google Gemini सारख्या AI ला मागे टाकत आहे.

ChatGPT आल्यानंतर या कंपन्यांनी त्यांचे जनरेटिव्ह एआय मॉडेल लॉन्च केले, ज्यांचे दोन वर्षांत लाखो युजर्स झाले. आता चीनी कंपनीच्या नव्या एआय मॉडेलने सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना चिंतेत टाकले आहे.

हे एआय टूल प्रगत भाषेवर काम करते, ज्यामध्ये हायब्रीड आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे. पण, R1 हे कंपनीचे पहिले AI मॉडेल नाही. कंपनीच्या AI मॉडेलची ही तिसरी आवृत्ती म्हणजेच V3 आहे. DeepSeek चे मुख्यालय चीनच्या Hangzhou शहरात असून, ही कंपनी 2023 मध्ये लिआंग वेनफेंग यांनी स्टार्टअप म्हणून सुरू केली होती.

DeepSeek R1 च्या लोकप्रियतेचे मुख्य कारण म्हणजे त्याची परवडणारी किंमत. सोप्या भाषेत समजून घेतल्यास, हे AI मॉडेल अमेरिकन AI मॉडेलपेक्षा खूपच स्वस्त आहे.