३ तासांत क्लेम सेटलमेंट अन् ७ दिवसांत मिळावं पेमेंट; IRDAI च्या विमा कंपन्यांना महत्त्वपूर्ण सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 09:16 AM2024-09-06T09:16:23+5:302024-09-06T09:24:58+5:30

IRDAI : जर कंपन्या अंतिम मुदत पूर्ण करू शकल्या नाहीत तर ग्राहक लोकपालाकडे जाऊ शकतात, असे IRDAI ने म्हटले आहे.

नवी दिल्ली : जीवन आणि आरोग्य विमा योजनांवर विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आपल्या नवीन परिपत्रकात ग्राहकांच्या हिताशी संबंधित विमा कंपन्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

या परिपत्रकात IRDAI ने म्हटले आहे की, विमा कंपन्यांनी देय तारखेच्या किमान एक महिना आधी प्रीमियम देय तारीख आणि पॉलिसी पेमेंट, जसे की मॅच्युरिटी किंवा सर्व्हायव्हल बेनिफिट यासंबंधी माहिती पाठवणे अपेक्षित आहे.

जर कंपन्या अंतिम मुदत पूर्ण करू शकल्या नाहीत तर ग्राहक लोकपालाकडे जाऊ शकतात, असे IRDAI ने म्हटले आहे. याशिवाय, IRDAI ने आरोग्य विम्यामध्ये कॅशलेस सेटलमेंट आणि फ्री लूक पिरियड यासंदर्भात विमा कंपन्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

IRDAI ने म्हटले आहे की, विमा कंपन्यांनी जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसींसाठी ३० दिवसांचा फ्री-लूक कालावधी द्यावा. तसेच, फ्री-लूक रद्द झाल्यास, प्रीमियमची रक्कम ग्राहकांना ७ दिवसांच्या आत परत केली पाहिजे.

याव्यतिरिक्त, पॉलिसी कर्ज आणि मूळ पॉलिसी अटींमध्ये बदलाशी संबंधित सेवा देखील सात दिवसांच्या कालावधीत झाल्या पाहिजेत. आरोग्य विम्याच्या बाबतीत, IRDAI ने पुनरुच्चार केला आहे की, कॅशलेस क्लेमची सेटलमेंट ३ तासांच्या आत आणि नॉन-कॅशलेस क्लेमची सेटलमेंट १५ दिवसांच्या आत केले पाहिजे.

याशिवाय, IRDAI ने मास्टर सर्कुलरमध्ये विमा कराराच्या विविध टप्प्यांत आवश्यक माहिती देणे आणि पॉलिसीच्या तपशीलांसह ग्राहक माहिती पत्रक समाविष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच, विमा कंपन्यांना प्रादेशिक भाषांमध्ये प्रस्ताव फॉर्म देण्यास सांगितले आहे.