Gautam Adani : कॉलेज ड्रॉपआऊट ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; असा होता गौतम अदानी यांचा प्रवास By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 02:58 PM 2021-11-25T14:58:49+5:30 2021-11-25T15:08:08+5:30
Gautam Adani: अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ही रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या संपत्तीच्या जवळ आली आहे. Gautam Adani : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), गौमत अदानी यांची एकूण संपत्ती 89.1 अब्ज डॉलर्स आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे 89.7 अब्ज डॉलर्ससह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. दोन्ही उद्योगपती आता आशियातील सर्वात श्रीमंत आहेत. गौतम अदानींच्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. कॉलेज ड्रॉपआऊट असलेली व्यक्ती इथवर कशी पोहोचली हे पाहू.
गौतम अदानी यांचा जन्म अहमदाबादमधील रतनपोल येथील सेठ नी पोल भागातील गुजराती जैन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शांतीलाल आणि आईचे नाव शांता अदानी असून त्यांना सात भावंडे आहेत.
गौतम अदानी यांचं शालेय शिक्षण सेठ सी.एन. अहमदाबाद या शाळेत झालं. त्यानंतर त्यांनी गुजरात विद्यापीठामध्ये बीकॉमला प्रवेश घेतला. पण दुसऱ्या वर्षीच त्यांनी कॉलेज सोडलं. आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न त्यांनी आपल्या उशारी बाळगलं होतं.
कॉलेज सोडल्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेनं आपला प्रवास सुरू केला. मुंबईत आल्यानंतर त्यांनी एका कंपनीत डायमंडचे काम सुरू केले. दोन वर्षांनी त्यांनी झवेरी बाजारमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला.
यानंतर त्यांच्या भावाने प्लॅस्टिक युनिट विकत घेतले होते, परंतु अदानी यांनी त्यात काम केले नाही आणि नंतर ते आपल्या घरी परतले. यानंतर अदानी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.
आर्थिक उदारीकरण गौतम अदानी यांच्यासाठी वरदान ठरलं. बाजारपेठेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा करून त्यांनी १९८८ मध्ये अदानी समूहाची स्थापना केली. त्यांच्या सुरुवातीच्या काळात, त्यांच्या समूहाने कृषी वस्तू आणि वीज क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं.
अदानी समूह ही पॉवर जनरेशन आणि ट्रान्समिशन, कोळसा व्यापार आणि खाणकाम, गॅस वितरण, तेल आणि वायू उत्खनन तसेच बंदरे आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये प्रमुख स्वारस्य असलेली एक मोठी कंपनी म्हणून उदयास आली आहे.
अदानी समूहात आता सहा कंपन्या आहेत. यामध्ये अदानी टोटल गॅस, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे. 1991 पर्यंत कंपनी संसाधने आणि वीज क्षेत्र या दोन्हीमध्ये वाढली होती. गौतम अदानींचा असा विश्वास होता की कंपनीच्या वस्तू आणि हितांमध्ये विविधता आणण्याची हीच योग्य वेळ आहे.
गौतम अदानी यांची संपत्ती यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत ५५ अब्ज डॉलर्सनं वाढली आहे. जून महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांचं वृत्त समोर आल्यानंतर अदानी समुहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली होती. ६ कंपन्यांच्या शेअर्समध्ये २० ते ६० टक्क्यांची घट झाली होती.
परंतु ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा यात तेजी दिसून आली आता हे शेअर्स वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. आता या कंपन्यांचं मार्केट कॅप १० लाख कोटी रूपये झालं आहे.
जुलै महिन्यात शेअर्सची किंमत घसरल्यानंतर अदानी यांचं नेटवर्थ ६३.५ अब्ज डॉलर्स झालं. १२ नोव्हेंबर रोजी त्यांचं नेटवर्थ वाढून ८४ अब्ज डॉलर्स झालं. अदानी समुहाच्या सातव्या कंपनीनं सेबीकडे IPO आणण्यासाठी अर्ज केला आहे. पुढील काही दिवसांत त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.