coronavirus: कोरोनामुळे रिअल इस्टेट क्षेत्राची अवस्था बिकट, गृहविक्रीत मोठी घट By बाळकृष्ण परब | Published: October 7, 2020 10:27 PM 2020-10-07T22:27:39+5:30 2020-10-07T22:46:15+5:30
real estate sector News : लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर मागणीत सुधारणा होण्याऐवजी जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमधील गृहविक्रीमध्ये मोठी घट दिसून आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी देशात सुरू झालेला कोरोना विषाणूचा फैलाव आणि कोरोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा रिअल इस्टेट सेक्टरला बसला आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार थंडावले असून, त्यामुळे घरांच्या मागणीत मोठी घट झाली आहे.
लॉकडाऊन हटवण्यात आल्यानंतर मागणीत सुधारणा होण्याऐवजी जुलै ते सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमधील गृहविक्रीमध्ये मोठी घट दिसून आली आहे. या शहरांमधील गृहविक्री ३५ टक्क्यांनी घटून ५० हजार ९८३ वर आली आहे.
एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. डेटा विश्लेषण करणारी कंपनी प्रॉप इक्विटीने सांगितले की, वर्षभरापूर्वी याच कालावधीमध्ये देशातील सात प्रमुख शहरे असलेल्या दिल्ली-एसीआर, मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यामध्ये मिळून ७८ हजार ४७२ घरांची विक्री झाली होती.
मात्र, एप्रिल ते जून या तिमाहीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यावर्षी एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये या शहरांमध्ये मिळून २४ हजार ९३६ घरांची विक्री झाली होती.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पॉपर्टी सल्लागार कंपनी असलेल्या एनारॉक ने गेल्या आठवड्यात सांगितले की, या सात शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबरदरम्यान, वार्षिक आधारावर गृहविक्री ४६ टक्क्यांनी कमी होऊन ती २९ हजार ५२० वर पोहोचली आहे.
प्रॉप इक्विटीचे संस्थापक आणि महासंचालक समीर जसुजा यांनी सांगितले की, भारतीय रिअर इस्टेट सेक्टरमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसत आहे. गेल्या तिमाहीत अनेक प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. आता पुढच्या सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर देतील त्यामुळे ग्राहक आकर्षित होतील.