CoronaVirus News: पीएम केअर्सला २१ कोटी देणाऱ्या 'त्या' कंपनीकडून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:44 PM2020-05-22T13:44:55+5:302020-05-22T13:56:30+5:30

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात, पगार कपातीस सुरुवात केली आहे.

कोरोनाचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून लाखो लोकांचा रोजगार संकटात सापडला आहे.

एकीकडे लॉकडाऊनमुळे मजुरांचे हाल सुरू झाले असताना, दुसरीकडे नोकऱ्यांवर संकट आल्यानं कर्मचारी वर्गदेखील अडचणीत सापडला आहे.

इंडियाबुल्स कंपनीनं २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली आहे.

अर्थ क्षेत्रात आतापर्यंत इंडियाबुल्स कंपनी इतकी कर्मचारी कपात कुठल्याही कंपनीनं केलेली नाही.

याआधी इंडियाबुल्सनं व्यवस्थापनातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे पगार ३५ टक्क्यांनी कापले. चालू आर्थिक वर्षासाठी पगार कपात करण्याचा कंपनीनं निर्णय घेतला.

कंपनीचे अध्यक्ष समीर गेहलोत यांनी संपूर्ण आर्थिक वर्षात पगार घेणार नसल्याचं जाहीर केलं.

तर कंपनीचे उपाध्यक्ष गगन बंगा यांनी केवळ २५ टक्के वेतन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे दीड महिन्यांपूर्वीच इंडियाबुल्सनं पीएम केअर्सला २१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं त्यावेळी कंपनीचे अध्यक्ष समीर गेहलोत यांनी म्हटलं होतं.

कोरोना विरुद्धच्या लढाईत इंडियाबुल्स हरतऱ्हेचं सहाय्य करेल, असंदेखील गेहलोत यांनी जाहीर केलं होतं.

आता इंडियाबुल्सनं २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिल्यावर नेटकरी संतापले आहेत. पीएम केअर्सला देण्यासाठी २१ कोटी आहेत. मग कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार कापू नका, असं आवाहन खुद्द पंतप्रधान मोदींनी केलं असताना इंडियाबुल्सनं थेट कर्मचारी कपात केली आहे.

Read in English