कोरोनाचा फटका; जगभरातील ५० कोटी लोक झाले बेरोजगार

By ravalnath.patil | Published: September 24, 2020 08:11 AM2020-09-24T08:11:17+5:302020-09-24T08:33:17+5:30

कोरोना व्हायरसमुळे जगभरात आर्थिक घडामोडींवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने बेरोजगारी वाढली आहे.

आता संयुक्त राष्ट्र संघटनेच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने (आयएलओ) एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जगभरात कोरोना महामारीमुळे ५० कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.

आयएलओने कामाचे तास कमी करण्याच्या आधारे हा अंदाज लावला आहे. आयएलओने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, कोरोनामुळे रोजगाराच्या मोर्चावर जेवढे मूल्यांकन केले होते. त्यापेक्षा अधिकाधिक लोक प्रभावित झाले आहेत.

या वर्षाच्या अखेरपर्यंत परिस्थिती सुधारण्याची शक्यताही कमी असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. कारण, आर्थिक घडामोडी हळूहळू पुन्हा पटरीवर येत आहेत.

५० कोटीहून अधिक बेरोजगारीच्या आकड्यांचा अंदाज कामाचे तास कमी होण्याच्या आधारे केला आहे. रिपोर्टनुसार, जगभरात वित्तीय वर्ष २०१९-२० च्या तुलनेत या वित्तीय वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कामाच्या तासांमध्ये १७ टक्क्यांची घट झाली आहे, जे ५० कोटी लोकांच्या नोकर्‍या जाण्याच्या बरोबरीचे आहे.

दरम्यान, याआधी जूनमध्ये आयएलओच्या रिपोर्टमध्ये कोरोनाच्या संकटामुळे ४० कोटी लोक बेरोजगार होण्याचा अंदाज होता. आता, कामकाजाच्या आधारे, रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, कोरोनामुळे १० कोटीहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत.

लेबर मार्केटला झालेले हे नुकसान मोठे आहे. जागतिक स्तरावर लेबर उत्पन्नात १०.७ टक्के घट झाली आहे, असे आयएलओचे अध्यक्ष गाई रायडर यांनी सांगितले. एवढचेच नाही तर कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली तर परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी भीती आयएलओने व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात मोठे संकट पसरले आहे. जगभरात तीन कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

भारतात सुद्धा कोरोना रुग्णांचा संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५६,४६०११ असून, बरे झालेल्यांचा आकडा ४५,८७,६१४ आहे. ९,६८,३७७ कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

जगामध्ये दररोज कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भारतात सापडत आहेत. मात्र, सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुस-या क्रमांकावर आहे.